ट्‌विंकल स्टारवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

सातारा - आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून मुदतीनंतर पैसे परत न देता सुमारे दहा लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉयल ट्‌विंकल स्टार क्‍बल प्रा. लि. कंपनीचे मालक व संचालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सातारा - आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून मुदतीनंतर पैसे परत न देता सुमारे दहा लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉयल ट्‌विंकल स्टार क्‍बल प्रा. लि. कंपनीचे मालक व संचालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मालक ओमप्रकाश बसंतलाला गोयंका, संचालक प्रकाश गणपत उत्तेकर, वेंकट रमन नटराजन, एन. एस. कोटनिस यांच्यासह कंपनीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रंजना दिलीप पाटील (वय 46, रा. वेचले, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती दिलीप यांना 2008 मध्ये टपाल कार्यालयामध्ये गुंतवलेली एक लाख 17 हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. त्यातील 17 हजार रुपये कर्ज खात्यावर भरून एक लाख रुपये त्यांच्याकडे उरले होते. हे पैसे त्यांना गुंतवायचे होते. या वेळी त्यांचे दीर दत्तात्रय हे रॉयल ट्‌विंकल स्टार क्‍लबचे गुंतवणूक प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांनी त्यांना कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी कंपनीच्या गोल्ड प्लॅनच्या नऊ वर्षांत दामतिप्पट या योजनेत एक लाख रुपये गुंतवले. 

या गुंतवणुकीची मुदत 18 डिसेंबर 2017 ला संपणार होती. त्यामुळे त्यांनी 24 सप्टेंबर 2017 ला कंपनीच्या नटराज मंदिर येथील कार्यालयात जाऊन प्लॅनचे प्रमाणपत्र व पासबुकची झेरॉक्‍स जमा केली. या वेळी मुदत संपल्यावर खात्यावर पैसे जमा होतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना रक्कम मिळाली नाही. त्याबाबत त्यांनी वेळावेळी पाठपुरावा केला. तेव्हा कंपनी आर्थिक अडचणीतून बाहेर आल्यावर पैसे देण्यात येतील, असे सांगण्यात आले. मात्र, आता कंपनीचे कार्यालय बंद झाले आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यासह त्यांच्या दिरांकडे रक्कम गुंतवलेल्या अन्य वीस जणांचे दहा लाख 55 हजार अशी एकूण 13 लाख 55 हजार रुपयांची संबंधित कंपनीने फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

तक्रार करण्याचे आवाहन 
ट्‌विंकल स्टार क्‍लब प्रा. लि. मध्ये अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Web Title: Twinkle Star admitted to the crime