बनावट नोटा प्रकरणी कल्याणहून दोघे अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सांगली - बनावट नोटा प्रकरणी शहर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. प्रेमविष्णू रोगा राफा (वय २६, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (वय ३३, आनंदवाडी, कल्याण) अशी त्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून दोन हजारच्या आणखी २९ बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. प्रकरणातील राज राजकुमार उज्जेनलाल सिंह (वय २८, कल्याण, ठाणे) हा यापूर्वीच पोलिसांच्या अटकेत आहे. 

बसस्थानका-जवळील एका दुकानात खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर तिथे दोन हजाराची बनावट नोट दिली.  गुरुवारी (ता. २३) रात्री पावणेदहाच्या सुमारास प्रकार उघडकीस आला. त्यावेळी राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य तिघांनी पलायन केले. सिंह चौकशीला प्रतिसाद देत नाही. मित्रांनी मला फसवले  आहे, इतकेच तो सांगत होता. त्यामुळे त्याचे तीन साथीदार हाती लागणे महत्त्वाचे आहे. राफा हा कल्याणमध्ये असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यासाठी उपनिरीक्षक गणेश शिंदे यांचे पथक तपासासाठी कल्याण (ईस्ट) ला गेले होते.  त्यावेळी प्रेमविष्णू राफा याला अटक केली. त्यावेळी  नरेंद्र ठाकूर यांचे मोबाइल लोकेशन विजापूर येथे दाखवल्याने तेथे जावून त्याला अटक केली. मात्र, टोळीतील चौथा साथीदार मनीष (पूर्ण नाव निष्पन्न नाही) हा अद्यापही पसार आहे.

अधीक्षक सुहैल शर्मा, उपाधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नाईक बिरोबा नरळे, हवालदार सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण, अमोल क्षीरसागर यांनी कारवाई केली. दरम्यान, दोघांनाही न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टोळीची सखोल चौकशी
दोन हजाराच्या बनावट नोटा शहरात खपवण्याच्या  प्रयत्नात असलेल्या या टोळीने बनावट नोटा कोठून आणल्या. त्या सांगलीतच का खपवण्याचा प्रयत्न होता. टोळीत आणखी किती जण आहेत, याची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली. तसेच टोळीतील सिंह हा मोलमजुरी करतो. राफा खासगी नोकरी, तर ठाकूर हमाली करतो. तिघांचीही तोंड ओळख आहे. टोळीचा म्होरक्‍या वेगळाच कोणी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Two Arrested in Duplicate Currency case Crime