नगरला दोन उपमहापौर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नगर - तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी नगरकरांनी दोन महापौरांचा कारभार अनुभवला. आता दोन उपमहापौरांचा कारभार पाहावा लागणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. कारण, प्रभागातील विकासकामांसाठी श्रीपाद छिंदम याने शनिवारी (ता. 11) महापालिका उपायुक्तांना पत्र दिले. त्यावर छिंदम याने स्वत: उपमहापौर असल्याचा शिक्का मारला आहे. त्यामुळे महापालिकेत उपमहापौरपद वादाचा नवा "लेटर बॉंब' आदळला असून, या पत्राने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. छिंदमच्या पत्राला काय "ट्रीटमेंट' द्यावी, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांसमोर पडला आहे.

उपमहापौरपदाच्या राजीनामापत्रावरील आपली सही खोटी असल्याची तक्रार छिंदम याने यापूर्वीच पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिस तपास करीत आहेत. विकासकामांसाठी उपायुक्तांकडे पत्र देताना छिंदम याने जुन्याच लेटरहेडचा वापर केलेला आहे. त्यावर भाजपचे चिन्ह असलेल्या चित्रावर कोरा कागद चिकटविला आहे. छिंदमला पक्षाने यापूर्वी दक्षिण भारतीय आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद देऊ केले होते. पक्षातूनच काढलेले असल्याने छिंदमने त्या पदावर पेननेच खाडाखोड केलेली आहे. मात्र, स्वत:च्या नावाखाली असलेले उपमहापौरपद कायम ठेवले आहे. शिवाय पत्राच्या शेवटी सही करताना "उपमहापौर, अहमदनगर महापालिका' असा शिक्काही मारलेला आहे. त्यामुळे या पत्राने प्रशासनासमोरील अडचणी आणखी वाढविल्या आहेत.

प्रभागातील रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके बसविणे; तसेच रस्त्याच्या पॅचिंगच्या कामाची मागणी छिंदमने पत्रात केली आहे. दिल्लीगेट परिसर, सुराणा कॉर्नर, दीक्षित मंगल कार्यालय परिसरातील विकासकामांसाठी त्याने हे पत्र उपायुक्तांना दिले आहे.

बोरुडे यांच्या गोटात अस्वस्थता
छिंदमच्या या पत्राने उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. छिंदमच्या तक्रारीवरून पोलिसांनी मागविलेली कागदपत्रे देण्याचे फर्मान प्रभारी आयुक्तांनी दिले आहे. त्यातून काय निष्पन्न होईल, हा भाग अलाहिदा; मात्र त्यातून महापालिकेत आता नक्की कुणाचा बळी जातो, या चर्चेला जोर आला आहे.

Web Title: two deputy mayor to ahmadnagar municipal