esakal | सोलापूर जिल्ह्यात पुन्हा दोन्ही देशमुखांचीच सद्दी? 
sakal

बोलून बातमी शोधा

Deshmukh

- नव्या समीकरणाबाबत संदिग्धता 
- संख्याबळाचे गणित महत्त्वाचे 
- संख्याबळाच्या यशस्वितेवरच भवितव्य 

सोलापूर जिल्ह्यात पुन्हा दोन्ही देशमुखांचीच सद्दी? 

sakal_logo
By
अभय दिवाणजी

सोलापूर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू असत नाही, हे पुन्हा एकदा राज्यात झालेल्या भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) या वेगळ्याच समीकरणातून सिद्ध झाले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या माध्यमातून राज्यात सत्तेचा सोपान चढू पाहणाऱ्यांना या नव्या समीकरणातून पायबंद घालण्यात भाजपचे "हायकमांड' यशस्वी ठरले आहे. परंतु 30 नोव्हेंबर 2019 ला होणाऱ्या संख्याबळाच्या यशस्वितेवरच या नव्या युतीचे भवितव्य असणार आहे. या नव्या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार असून दोन ज्येष्ठांपैकी कोण अजितदादा गटात जाणार यावर त्यांना मिळणाऱ्या लाभाचा विचार होईल. सध्या तरी जिल्ह्यात पुन्हा एकदा देशमुखांची सद्दीच राहणार असे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान, अकलूजकरांमध्ये मात्र मोठे समाधानाचे वातावरण दिसू लागले आहे. 

हेही वाचा : सोशल मीडियावर हे रंगले राजकीय विनोद 
यांना मिळू शकते संधी 

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात पुन्हा भाजप-सेना महायुती सत्तारूढ होणार अशी अटकळ बांधली गेल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीतून काहींनी भाजपमध्ये तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाल्याने राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली गेली. राज्यात सेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस ही वेगळीच युती सत्तेवर येण्यासाठी उत्सुक झाली होती. तेव्हाही काही समीकरणे बदलण्याच्या स्थितीत असतानाच शनिवारी सकाळच्या राजकीय "सर्जिकल स्ट्राईक'ने अनेकांची झोपच उडवली. गेल्या पाच वर्षांत युतीच्या सरकारात पहिल्याच मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांना राज्यमंत्री तर नंतर विस्तारात सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाली. आता नव्या समीकरणात या दोघांना पुन्हा मोठी संधी आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या आमदारांनाही संधी मिळू शकते. 

हेही वाचा : फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी 
अकलुजकरांमध्ये समाधान 

राष्ट्रवादीकडून मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे या दोघांचा नक्कीच विचार होऊ शकतो. परंतु ते शरद पवार यांच्या की अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहतात, यावर सारे अवलंबून आहे. मोहोळमधून प्रथमच निवडून आलेले आमदार यशवंत माने यांचा विचार होणे अशक्‍य दिसते. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि समर्थकांमध्ये मध्यंतरी चिंतेचे वातावरण होते. अचानकच बदललेल्या या नव्या समीकरणामुळे अकलूजकरांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

हेही वाचा : भाजपला मी व्यापारी समजत होता पण.., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत 
"मॅजिक फिगर'चे औत्सुक्‍य 
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी संयुक्तपणे सरकार स्थापनेचा दावा केलेला असला तरी "मॅजिक फिगर' गाठणे महत्त्वाचे ठरणार आहे. 145 हे संख्याबळ जमविले तरच हे नव्या समीकरणाचे सरकार सत्तारूढ होईल. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे पाहणे औत्सुक्‍याचेच ठरणार आहे. 

देव पाण्यात 
शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा समीकरणातून सत्ता मिळेल आणि आपल्याला या सरकारात मोठी संधी मिळेल, या आशेने काहीजणांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. परंतु भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) या नव्या समीकरणामुळे महाशिवआघाडीतील नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अधुरेच राहील, असे दिसते. त्याचाही फैसला 30 नोव्हेंबरनंतरच होईल.

loading image