शेतीकर्जाला कंटाळून सख्ख्या भावांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

हे दोघेही शेतकरी उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढले होते. जगन्नाथ आणि विजय या दोघांनाही प्रत्येकी दोन मुले आहेत.

सातारा - बँकांच्या कर्ज वसुलीला कंटाळून वडगाव हवेली (ता. कराड) येथील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. 

जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत. दोघेही प्रगतीशिल शेतकरी होते. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरू न शकल्याने बँकेकडून सतत तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी विजय चव्हाण या धाकट्या भावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे मोठा भाऊ जगन्नाथ चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या  केली. या आत्महत्येमुळे वडगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे. 

या दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. रूग्णालयातच त्यांचे ठिय्या आंदोलन केले. हे दोघेही शेतकरी उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढले होते. जगन्नाथ आणि विजय या दोघांनाही प्रत्येकी दोन मुले आहेत. विजय यांनी बीएसस्सी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते. 

Web Title: two farmers brothers suicide in satara