दोनशे मुली शिक्षणाच्या प्रवाहात 

कुंडलिक पाटील
सोमवार, 25 जून 2018

कुडित्रे (जि. कोल्हापूर) - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आजही डोंगरी वाड्या-वस्त्यांवर वाहतुकीची सुविधा व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत मुलींना मोफत सायकल मिळाल्याने दोनशे मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 

कुडित्रे (जि. कोल्हापूर) - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी आजही डोंगरी वाड्या-वस्त्यांवर वाहतुकीची सुविधा व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत मुलींना मोफत सायकल मिळाल्याने दोनशे मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 

श्रीराम ज्युनिअर कॉलेजच्या सायकल बॅंकेतून मुलींची जीवनाचीच शैक्षणिक एफडी झाली. सातर्डे, दुर्गुळवाडी, म्हारूळ, कोगे, शिंदेवाडी, बहिरेश्वर, वाकरे यांसह करवीर, पन्हाळा तालुक्‍यांतील काही गावांतून वाहतुकीची सुविधा नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. दहावीनंतर शिक्षण सोडून घरी बसावे लागते. ही परिस्थिती ओळखून अशा मुलींसाठी सायकली दिल्या तर त्यांचे शिक्षण पूर्ण होईल, अशी संकल्पना करून सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, उपप्राचार्य बी. एल. पाटील यांनी 11 वी, 12 वीसाठी सायकल बॅंक उभा करण्याचे ठरविले. आसगावकर यांनी 2016मध्ये अमेय या आपल्या मुलाची सायकल, सायकल बॅंकेस भेट दिली. शिक्षक रणजित इंगवले यांनी दुसरी सायकल भेट दिली. विजय जाधव यांच्या पांजरपोळ मित्र परिवाराने सुरवातीला 10, नंतर 40, तर पुण्यातील शिक्षक संघटनेने 12 सायकली दिल्या. शिक्षकांनी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सायकली दिल्या. 

प्राचार्य सी. एम. सातपुते, प्रा. नीता पोवार, क्‍लार्क तानाजी पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील वितरणात संयोजन करत आहेत. बघता बघता 200 सायकलींची बॅंक उभी झाली. दोन वर्षांत 220 मुली शाळा शिकल्या. तसेच प्रवासातील वेळ वाचून स्वयंशिस्त लागली, मुलींचे आरोग्य सुधारले, असेही फायदे झाले. 

आणखी 100 सायकलींची गरज 
करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्‍यांतून 755 मुली येथे शिक्षण घेतात. येथे आणखी 100 सायकलींची गरज भासते. काही राजकीय नेत्यांनी सायकली देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्याचा विसर नेत्यांना पडला आहे. 

अनेक घरांत सायकली गंजत पडल्या आहेत. त्या भंगारवर विकतात. सामाजिक ऋण पाहावे. दातृत्व गुणाचा अभाव असल्याने देण्याची भावना नाही. मुली शिकल्या तर देश घडेल. 
- बी. एल. पाटील, उपप्राचार्य 

सायकलींमुळे आमचे शिक्षण झाले. वेळ, पैसे वाचून आरोग्य सुधारले. सायकल बॅंक गोरगरीब मुलींची आधारवड आहे. 
- अस्मिता नाईक, तनुषा पोवार, सातार्डे 

Web Title: Two hundred girls in the stream of education