"या' कारणासाठी झाले करीमभाईंचे अपहरण

Two men arrested for kidnapping of karimbhai
Two men arrested for kidnapping of karimbhai

नगर  : उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज पहाटे परतूर येथून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांनी 25 लाख रुपयांसाठी अजहर शेखच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. 

वैभव विष्णू सातोनकर (वय 19, रा. सातोनकर गल्ली, परतूर, जि. जालना), निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय 20, रा. लढ्ढा कॉलनी, परतूर, जि. जालना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजहर मंजूर शेख (रा. फकीर गल्ली, नगर), फतेह सिद्धीक अहमद अन्सारी (रा. मलंगशहा मोहल्ला, परतूर, जि. जालना) अशी पसार आरोपींची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी, शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी पहाटे फकीर गल्ली येथून पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केले होते. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

घटना घडल्यापासून तोफखाना, कोतवाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक करीमभाई यांचा शोध घेत होते. पोलिसांना करीमभाई जालना येथे असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी करीमभाईंना जालना येथे सोडून पळ काढला होता. त्यानंतर दुपारी करीमभाई नगरकडे एसटी बसने येत असताना पोलिसांनी जेऊर टोल नाका येथे त्यांना उतरून घेतले. मात्र, करीमभाईंचे अपहरण कशासाठी करण्यात आले, या घटनेचे गूढ कायम होते. 

पोलिसांनी घातला छापा 
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पोलिस पथके आरोपींच्या मागावर होती. कुख्यात गुन्हेगार अजहर शेख हा या गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे. त्याला तिघे साथीदार आहेत, अशी खबर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. हे आरोपी परतूर येथे एका घरामध्ये दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल मन्सूर शेख, दत्ता हिंगडे, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे, रवी सोनटक्के यांनी मंगळवारी (ता. 19) पहाटे परतूर येथील घरावर छापा घालून वैभव सातोनकर, निहाल शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अन्य आरोपींची चौकशी केली असता ते दोघे चहा पिण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेल्याची माहिती त्यांनी दिली. 


पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. पोलिस आल्याची चाहूल लागताच ते अपहरणात वापरलेली मोटार सोडून पसार झाले. ते वाहन परतूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. 

दरम्यान, त्या दोघांची कसून चौकशी केली असता अजहर शेख यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. अजहर शेख याला 25 लाख रुपयांची आवश्‍यकता असल्याने त्याच्या सांगण्यावरून आणि संगनमताने सोमवारी पहाटे करीम हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. दरम्यान, करीम हुंडेकरी यांना सोडल्यानंतर 5 डिसेंबर 2019 रोजी 25 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे हुंडेकरी यांना काल जालना येथे सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. 

नेमकी काय झाली डील? 
आरोपींनी करीमभाई यांना जालना येथे सोडून दिले. तेथे नेमके काय ठरले? आणि कोणाबरोबर ठरले? करीमभाई यांना एसटीचा प्रवास करण्यासाठी कोणी पैसे दिले, अशा अनेक प्रश्‍नांचे गूढ कायम आहे. मात्र, अजहर शेख याला अटक केल्यानंतर संपूर्ण गुन्ह्याची उकल होईल, असा दावा पोलिस करीत आहेत. 

ही आहे अजहरची कुंडली 
सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार अजहर मंजूर शेख हाच अपहरणाच्या गुन्ह्यातील मास्टर माईंड असल्याचा संशय पोलिसांना कालपासून होता. त्यानुसार पोलिस गुन्ह्याचा तपास करीत होते. अजहर शेख याच्याविरुद्ध शस्त्र बाळगणे, विनयभंग, दरोड्याची तयारी, खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पत्नीचा खून केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत त्याच्यावर 17 सप्टेंबर 2009 रोजी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात सात, तर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. विशेष म्हणजे अजहर हा करीमभाईंच्याच गल्लीत राहतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com