esakal | इराणमधून आलेले आणखी दोघे क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Two more quarantines came from Iran

इराणहून इस्लामपुरात आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दिलासा मिळाल्याची स्थिती असतानाच काल (ता. 28) एक दांपत्य इराणहून दाखल झाले. या दोघांमुळे वाळवा तालुका आरोग्य यंत्रणेसमोर आणखी पेच निर्माण झाला आहे. 

इराणमधून आलेले आणखी दोघे क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : इराणहून इस्लामपुरात आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दिलासा मिळाल्याची स्थिती असतानाच काल (ता. 28) एक दांपत्य इराणहून दाखल झाले. या दोघांमुळे वाळवा तालुका आरोग्य यंत्रणेसमोर आणखी पेच निर्माण झाला आहे. 

इराणहून आलेले हे दोन जण लाडेगाव (ता. वाळवा) येथील आहेत. ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील कर्मवीर विद्यालयात त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे. आरोग्य विभागाने त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. ते भारतातून 20 फेब्रुवारीला तिकडे गेले होते. 21 फेब्रुवारीला इराणला पोचले. इराणमधून ते 14 मार्चला परत निघाले. ते 15 मार्चला दिल्लीत पोचताच त्यांना लगेच राजस्थानमधील जैसलमेर येथे हलविले होते.

15 ते 27 मार्चदरम्यान त्यांना जैसलमेरमधील मिलिटरी कॅम्पमध्ये क्वारंटाईन केले होते. ते काल दुपारी दोनला लाडेगाव येथे आले. आधीच बाहेरून येणाऱ्या लोकांची नावे पोलिसांकडून आरोग्य विभागाला मिळाली असल्याने त्यांनी लक्ष ठेवले होते. ते येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना कर्मवीर विद्यालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. 
शनिवारी (ता. 25) कोल्हापूर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता.

त्याच्याबरोबर पाच जण इराणहून आले होते. त्यापैकी एकजण इस्लामपूर शहरातील होता. सुदैवाने त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. इस्लामपूर प्रशासनाने त्या व्यक्तीला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते. इराणमधून आलेली ही व्यक्ती राजस्थानमधील जैसलमेर येथे काही दिवस क्वारंटाईन करण्यात आली होती; तसेच काल लाडेगाव येथे आलेल्या दांपत्यालाही क्वारंटाईन करण्यात आले होते. 

आणखी 10 जण होम क्वारंटाईन! 
निगडी (ता. शिराळा) येथील युवती आणि तिची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना इस्लामपूर येथील ज्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते, तेथे आलेल्या अन्य रुग्णांची व संबंधित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्या दोघींच्या सर्व हालचाली तपासण्यात आल्या असून, त्या अनुषंगाने 33 जणांवर संशयाची सुई आहे. त्यापैकी 23 जणांचा शोध सुरू आहे. सापडलेल्या 10 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अन्य लोकांचा शोध सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले.