कारागृहातून पळालेले दोन गुन्हेगार जेरबंद  दोन साथीदारांनाही अटक

शैलेश पेटकर
Wednesday, 7 October 2020

सांगली कारागृहातील कैद्यांसाठी उभारलेल्या अलगीकरण कक्षातून पळून गेलेल्या दोन्ही गुन्हेगारांना मध्यरात्री जेरबंद करण्यात आले.

सांगली : कारागृहातील कैद्यांसाठी उभारलेल्या अलगीकरण कक्षातून पळून गेलेल्या दोन्ही गुन्हेगारांना मध्यरात्री जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाला कऱ्हाड येथे पकडले; तर सांगली शहर पोलिसांनी दुसऱ्याला 100 फुटी रस्ता परिसरात जेरबंद केले. दोघांनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याशिवाय, लुटमारीच्या गुन्ह्यातील त्या दोघांच्या दोन साथीदारांना इनाम धामणी येथे अटक करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. 

राजा ऊर्फ राजू नागेश कोळी (वय 20, रा. काळीवाट), नाग्या ऊर्फ नागेश ऊर्फ रोहित बाळू जगदाळे (19, रा. पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. लुटमारीच्या गुन्ह्यात या दोघांबरोबर असणाऱ्या राक्‍या ऊर्फ राकेश शिवलिंग हादिमणी (26, रा. काळीवाट), दीपक आबा ऐवळे (आवळे) (20, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) यांनाही अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांनाही लुटमारीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 19 सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर कारागृहासाठी उभारण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 27 सप्टेंबरला मध्यरात्री दोघेही खिडकीच्या काचा काढून तेथून पळून गेले होते. पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत होते.

मध्यरात्री रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. त्या वेळी हवालदार बिरोबा नरळे यांना यातील राजू कोळी कऱ्हाड येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, नरळे, संतोष गळवे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, सांगली शहर पोलिसांनी रोहित जगदाळे याला 100 फुटी रस्ता परिसरातून अटक केली. 

लुटमारीच्या गुन्ह्यातील संशयित राकेश हादिमणी आणि दीपक ऐवळे यांना इनाम धामणी (ता. मिरज) येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अटक करण्यात आल्याचे निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले. चौघांनाही अटक केल्यावर पथकाने त्यांच्या जीपची झडती घेतली. त्यात त्यांनी चोरलेले दोन मोबाईल, धारदार एडका, कात्री, 850 रुपये असा मुद्देमाल सापडला. तो जप्त करण्यात आला आहे. त्यांनी राजू कोळी याने ते दोन्ही मोबाईल तुरची फाटा, तसेच पंढरपूर रस्त्यावर एका ट्रकचालकाकडून जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two prisoners who escaped from the Sangali jail were also arrested again