सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी | Sangli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी

सांगली-मिरजेतील पंडितजींच्या दोन भेटी

सांगली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सांगली जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर असे दोन वेळा आले होते. त्यापैकी १९६२ मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आणि १९३७ मध्ये मिरजेत नातलगांच्या वैद्यकीय उपचारासाठी ते आले होते. सांगलीतील स्टेशन चौकातील गांधी पुतळ्याचीही त्यांनी पाहणी करून कौतुकाची थाप दिली होती.

पंडितजींच्या स्मृतींचा मागोवा घेताना येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लताताई देशपांडे म्हणाल्या, ‘‘माझे वडील जी. एस. देशपांडे यांची नेहरूंवर असिम श्रद्धा होती. ते काँग्रेसचे तेव्हाचे सांगलीचे पुढारी होते. १९६२ च्या सभेवेळी पक्षाचे ते सरचिटणीस होते. स्वामी रामानंद भारती अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढत होती. ती सभा विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर झाली होती.

हेही वाचा: कोल्हापूर : बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान

तिसऱ्यांदा काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकत सत्ता हस्तगत केली; मात्र पंडितजींसाठी ती शेवटचीच लोकसभा ठरली. या सभेत त्यांनी मंचावरील बैठ्या टेबलवर बसूनच भाषण केले होते. न कळत्या वयात त्यावेळी मी वडिलांसोबत कोल्हापूरच्या सभेलाही गेल्याचे स्मरते. या सभेनंतर विश्रामबाग येथील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-पाण्यासाठी ते आले होते. पंडितजीच्या स्मृती आम्ही आजही जपल्या आहेत. सांगलीच्या स्टेशन चौकात उभ्या केलेल्या त्यांच्या पुतळ्याचे मूळ कास्टिंग मॉडेल आमच्या शाळेच्या सभागृहात आम्ही जपून ठेवले आहे.’’

सांगलीतील सभेसाठी पंडितजी कोल्हापूरहून आले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांचा ताफा आताच्या शास्त्री चौकात अडवून सांगलीतील काही नागरिकांनी त्यांना हार अर्पण केला होता. भर रस्त्यात अडवून भारताच्या पंतप्रधानांना तेव्हा हार घातला जात होता. आजच्या काळात ही कल्पनाच वाटेल; पण तो काळ तसा होता. सांगलीतील सभा आटोपून ते कऱ्हाडच्या दिशेने गेले असता पेठ येथे काँग्रेसचे पुढारी आकाराम पाटील यांनी त्यांचे असेच भर रस्त्यात स्वागत केल्याची आठवण त्यांचे कनिष्ठ बंधू दिवंगत वकील वसंतराव पाटील यांनी सांगितली होती. पंडितजींची स्वातंत्र्यपूर्व काळातील भेट सांगलीत नव्हे तर मिरजेत होती, असे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: सोलापूर : केगाव- विजयपूर बायपास अंतिम टप्प्यात

ते म्हणाले,‘‘पंडितजी मिरजेत मिशन रुग्णालयात आले होते. तेव्हा ते रेल्वेनेच आले असावेत. मिशन रुग्णालयात त्यांच्या जवळच्या नातलगाच्या उपचारासाठी ते आले होते. त्यावेळी ते मिरजेतील प्रसिध्द धन्वंतरी रामकृष्ण हरी भडकमकर यांच्या वाड्यात आले होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी असलेल्या डॉ. भडकमकर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वट होता. ते त्या काळातील प्रसिध्द डॉक्टर होते. पंडितजींचे त्यांच्या घरी येणे, यातून त्यांचे स्थान स्पष्ट होते.’’

प्रतापगडावरही सांगलीकर

संयुक्त सातारा जिल्ह्यात सांगलीची ओळख दक्षिण सातारा जिल्हा अशी होती. द्विभाषिकातून स्वतंत्र महाराष्ट्र स्थापना होण्यापूर्वी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंडितजी आले होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा जोर होता. पंडितजींना काळे झेंडे दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रतापगड ताब्यात घेतला होता. त्या आंदोलनासाठी सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक गेले होते, अशी माहिती विजय बक्षी यांनी दिली.

loading image
go to top