परीक्षेला एकत्र जाऊया म्हणाले, अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

या अपघातामध्ये रोहित शहाजी सोनवले (वय २० रा. घानवड) आणि प्रणय मारुती भिसे (वय २० रा. शिंदेवाडी, ता. खटाव) जखमी झाले आहेत. आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालात विवेक व त्याचे मित्र शिक्षण घेत होते. महाविद्यालयात परीक्षा असल्याने सकाळी अकराच्या सुमारास विवेक हा खानापूरहून विट्याला येत होता.

विटा ( सांगली ) - मोटार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. विवेक राजकुमार माने (वय १९, रा.खानापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी बाराच्या सुमारास विटा - तासगांव रस्त्यावर चंद्रसेननगर येथे झाला. याबाबत डॉ. ए. डी. पाटील यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. 

या अपघातामध्ये रोहित शहाजी सोनवले (वय २० रा. घानवड) आणि प्रणय मारुती भिसे (वय २० रा. शिंदेवाडी, ता. खटाव) जखमी झाले आहेत. आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालात विवेक व त्याचे मित्र शिक्षण घेत होते. महाविद्यालयात परीक्षा असल्याने सकाळी अकराच्या सुमारास विवेक हा खानापूरहून विट्याला येत होता.

हेही वाचा - शपथविधीसाठी या दाम्पत्याला मातोश्रीवरून निमंत्रण 

एकाच गाडीवरून जाण्यासाठी तिघे आले एकत्र

विट्यात आल्यावर त्याला मित्राचा फोन आला. दुचाकीवरुन आपण परीक्षेला जावूया, असे ते म्हणाले. यासाठी विवेक हा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून थांबला. घानवडहून रोहीत आणि मायणीहून प्रणय तेथे आला. हे तिघे मिळून दुचाकी (एम.एच. १०. सी.जी.२७३८) वरुन महाविद्यालयाकडे परीक्षेला निघाले होते. विटा - तासगांव रस्त्यावरील चंद्रसेननगर येथे आल्यानंतर समोरहून येणाऱ्या मोटारीची (पी.वाय.१. बी.आर. ३९३१) धडक दुचाकीचा बसली. या अपघातामध्ये विवेक जागीच ठार झाला तर प्रणय आणि रोहित हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. यातील प्रणयची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कऱ्हाडला नेण्यात आले आहे.

हेही वाचा - सोन पावलांनी आली... दागिने घेऊन गेली...! ; कसे ते जरूर वाचा 

नातेवाईकांची विटा रुग्णालयात धाव

अपघाताची माहिती महाविद्यालयात कळताच आदर्श शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी पी. टी. पाटील यांच्यासह आरोग्य सभापती अ‍ॅड. विजय जाधव, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, गजानन निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. विवेकच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच त्याच्या नातेवाईकांनी विटा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. विवेकच्या आईचा आक्रोश हदय हेलावणारा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wheeler And Motor Accident On Vita Tasgaon Road One Dead