जामखेडमध्ये गोळ्या झाडून दोघांची हत्या; शहरात तणाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

जामखेड : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते रॉकी ऊर्फ राकेश राळेभात या दोघांची तीन अज्ञात व्यक्तींनी आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील बाजार समिती कॉम्प्लेक्‍ससमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. घटनास्थळी वापरण्यात आलेली नऊ व एक जिवंत काडतुसे सापडली. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

या संदर्भात अधिक माहिती अशी, योगेश व राकेश आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्‍ससमोरच्या चहाच्या हॉटेलसमोर बसले होते. त्या वेळी तोंड बांधलेले तिघे तेथे मोटरसायकलवरून आले व त्यांनी या दोघांवर जवळून गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. गोळीबाराचे कारण मात्र समजू शकले नाही. 

दरम्यान, घटनास्थळी आठवडेबाजारामुळे मोठी गर्दी होती. रहदारीच्या ठिकाणी गोळीबार घडल्याने एकच पळापळ झाली. योगेश व रॉकी यांना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आरोग्यसेविकांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरला पाठविले. नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

या दोघांचेही मृतदेह रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे मोठा जमाव जमला होता. त्या वेळी तेथे आलेल्या पालकमंत्री राम शिंदे यांना जमावाच्या रोषाचा व घोषणाबाजीचा सामना करावा लागला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेच्या निषेधार्थ उद्या (रविवार) "जामखेड बंद'ची हाक देण्यात आली आहे.

Web Title: two youths murder in Jamkhed