दशकानंतर साताऱ्यात 'मनोमीलन' आमने-सामने!

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

दिवाळीच्या सणाचे चार दिवस सरल्यानंतर सातारा विकास आणि नगर विकास आघाडीचे समर्थक "सोशल मीडिया'च्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडले आहेत. कोण सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा मुद्दा पुढे रेटत आहे. तर, कोणी आठ महिने रजेवर पाठवलेली नगराध्यक्षा सर्वसामान्यच होती ना, असा सवाल करून जुन्या जखमेवरील खपली काढत आहे.

दिवाळीच्या सणाचे चार दिवस सरल्यानंतर सातारा विकास आणि नगर विकास आघाडीचे समर्थक "सोशल मीडिया'च्या माध्यमातून एकमेकांवर तुटून पडले आहेत. कोण सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा मुद्दा पुढे रेटत आहे. तर, कोणी आठ महिने रजेवर पाठवलेली नगराध्यक्षा सर्वसामान्यच होती ना, असा सवाल करून जुन्या जखमेवरील खपली काढत आहे.

कोणी स्वघरातील विरोधाला राजकीय बंडाची उपमा दिली आहे तर कोणी पाच प्रश्‍नांची उत्तरे मागितली आहेत. दगडाखाली हात..., 2002 चे नगराध्यक्ष सक्तीचे रजा प्रकरण... अशा आठवणी आरोप-प्रत्यारोपांच्या निमित्ताने ताज्या केल्या जाऊ लागल्या आहेत. डिसेंबर 2006 ते नोंव्हेंबर 2016 अशी तब्बल दहा वर्षे मनोमिलनातून सुखाने नांदणाऱ्या साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांची परस्परांविषयीची राजकीय भूमिका काय आहे, हे जाणून घेणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे!

सगळीकडेच "मी-मला-आम्हाला' चालत नाही

सातारा विकास आघाडी : राजघराण्यातील उमेदवारांच्या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सामान्य जनतेला संधी दिली आहे. सगळीकडेच मी-मला-आम्हाला पाहिजे असे चालत नाही, हे खासदारांनी कृतीतून दाखवून दिले आहे. नेत्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड, स्वार्थ न पाहता सातारकरांसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. स्वतः शिवरायांनी स्वकीयांशी दोनशेहून अधिक लढाया केल्या. उदयनराजे त्याला कसे अपवाद असतील ! 2 वेळा खासदार, 40 वर्षे आमदार व 2 वेळा नगराध्यक्ष ही सर्व पदे सातारकरांनी राजघराण्याला दिली. सर्वसामान्य जनतेचा, त्यांच्या आशा-आकांक्षेचा विचार करून राजघराण्यातील व्यक्तीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवू नये, असे उदयनराजेंना वाटत होते. स्वघराण्यातला उमेदवार नसावा, म्हणून उदयनराजेंनी त्याला विरोध करणे म्हणजे एक प्रकारे सर्वसामांन्याच्या हक्कासाठी व सातारकरांसाठी पुकारलेले एक प्रकारे बंडच आहे ! "निवडणुकीवेळी माझे हात दगडाखाली होते, आता माझ्या हातात दगड आहेत' असे मतदारांना उद्देशून काढलेले शब्द सातारकर नक्कीच विसरले नसतील !! नगराध्यक्षच करायचे होते तर यापूर्वी का केले नाही? यंदा जास्त अधिकार व जास्त मुदत मिळणार म्हणून का एवढा आटापिटा !!!

रावत सुद्धा सर्वसामान्य होत्याच की?

नगर विकास आघाडी : आरोग्य-मोतीबिंदू तपासणी, रक्तदान-शस्त्रक्रिया शिबिरे, जयपूर फुट वाटप शिबिरे झाली असून हजारो लोकांना लाभ झाला. कर्तव्य सोशल ग्रुप हे नाव माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. या ग्रुपची प्रेरणा आणि शक्ती म्हणजे वेदांतिकाराजे! नगराध्यक्षपदासाठी विशिष्ट नाव नको होते तर आधी का सांगितले नाही ? "साविआ'साठी नगराध्यक्षपद सोडायची तयारी शिवेंद्रराजेंनी दर्शवली होती हे खरे नाही का ? मनोमीलन टिकावे म्हणून कुणी, किती प्रयत्न केले ? यासंदर्भात घराण्यातील ज्येष्ठांनी दिलेली माहिती खोटी का? त्रागा राजघराण्यातील व्यक्ती नको म्हणून की बाहुला नगराध्यक्ष हवा म्हणून ? हे सामान्यविषयींचे खोटे प्रेम की कामाच्या धडाक्‍याची खरी धास्ती ? थेट निवडून आलेल्या महिला नगराध्यक्षाला चेकवर सह्या करत नाही म्हणून वेठीस धरले आणि तब्बल 8 महिने सक्तीच्या रजेवर पाठविले. एका सर्वसामान्य महिला नगराध्यक्षाला रजेवर पाठवण्याचा दुर्दैवी इतिहास कोणी घडवला, हे सर्वश्रुत आहे. अवघ्या महाराष्ट्रात कधीही अशी केविलवाणी घटना घडली नाही, ती घटना सातारा नगरपालिकेत घडली. केवळ राजघराण्यातील उमेदवार आहे म्हणून सातारा पालिकेचे आणि शहराचे नुकसान करायचे का? याचाही विचार झाला पाहिजे.

Web Title: udayanraje and shivendraraje bhosale fight each other in Satara Municipal Council election