अखेर उदयनराजेंनी भाजप प्रवेश केला जाहीर

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

उदयनराजे राष्ट्रवादी काॅंग्रेसला ठाेकणार राम राम

सातारा ः  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या फेसबुक पेज आणि ट्विटरवरून जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमातून दिले जात होते; परंतु उदयनराजे यांनी स्वतःहून तसे जाहीर केले नव्हते. आज (शुक्रवार) तासाभरापूर्वी उदयनराजे यांच्या फेसबुक पेज आणि ट्विटरद्वारे त्याबाबत जाहीर करण्यात आले आहे. 

यामध्ये आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील. 

उद्या (ता. 14) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje announces BJP entry