धोका टाळण्यासाठी उदयनराजेंची भाजपला टाळी

धोका टाळण्यासाठी उदयनराजेंची भाजपला टाळी

सातारा - एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट नाकारले जाण्याची वाट भाजपचे नेत पाहत आहेत, तर दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्याप यश आलेले नाही. तरीही संभाव्य धोका टाळण्यासाठी उदयनराजेंनीही भाजपच्या टाळीला प्रतिसाद देत त्यांचा हात आपल्या हातात ठेवल्याचे दिसत आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला, याबाबत खुद्द राष्ट्रवादीतील नेत्यांमध्येही आता संभ्रमाचे वातावरण आहे. मध्यंतरी पाटणच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभेबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत काही ज्येष्ठ व जुन्या नेत्यांच्या नावांवर चर्चा केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने उदयनराजेंना पर्याय ठरणाऱ्या उमेदवाराचा शोध सुरूच ठेवल्याचे दिसत आहे. मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल मोदींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचे कौतुक केले होते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या तोंडीही उदयनराजेंचेच नाव होते. भाजपच्या या कार्यक्रमात उदयनराजेंवर उधळली गेलेली स्तुतीसुमने पाहता उदयनराजेंची भाजपच्या नेत्यांशी जवळीक वाढल्याचे स्पष्ट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाफटका होण्याची चिन्हे लक्षात घेता उदयनराजेंनी सर्व पातळ्यांवर सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 

आजपर्यंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविषयी उदयनराजेंच्या तोंडी कधी सौजन्याचे वक्तव्य आले नव्हते. पण, साताऱ्यातील कार्यक्रमात त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे राजेशाही थाटानेच घेतली. त्यामुळे या सर्वांशी त्यांनी जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारल्याचेही स्पष्ट होत आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेचे तिकीट अंतिम होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

उदयनराजेंनी या खेळीतून राष्ट्रवादी असो वा भाजप, माझी उमेदवारी निश्‍चित या भूमिकेतूनच वाटचाल सुरू ठेवल्याचे दिसत आहे. भाजपच्या नेत्यांना उदयनराजेंसारख्या उमेदवाराची आवश्‍यकता आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट नाकारले जावे, याचीच वाट भाजपचे नेते पाहत आहेत. तर राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यास त्यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील चार आमदारांची अडचण होईल, अशी भीतीही आहे.  या भीतीतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही रिस्क घेणार नाहीत, असे सध्यातरी दिसते. तरीही पाटणच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून एखादा ज्येष्ठ उमेदवार दिल्यास काय होईल, यावरही विचारविनिमय केला आहे. सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंना पर्याय मिळविण्यात राष्ट्रवादीला अद्यापपर्यंत यश आले नसले तरी, आगामी काळात राष्ट्रवादीकडून कोणता दगाफटका झालाच तर, दुसरी योजना तयार असावी, म्हणूनच उदयनराजेंनी भाजपच्या टाळीला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.

राजमातांची पंतभेट चर्चेत...
काल उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विकासकामांसंदर्भात चर्चा केली. या चर्चेवेळी खासदार उदयनराजेंनीही मुख्यमंत्र्यांना मोबाईलवरून संपर्क करून काही गोष्टी कानावर घातल्या. राजमातांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट विकासकामांसोबतच उदयनराजेंच्या आगामी वाटचालीसंदर्भातील चर्चेची ठरल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीवर दबावतंत्र राबविण्यासाठी उदयनराजेंकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचेही मानले जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com