' महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे ' जयघाेषात नेत्यांनी भरले अर्ज

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजपचे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (मंगळवारी) आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी रॅलीत हजारोंच्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते.

सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

राजवाडा येथून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी ढोल-ताशा वादक त्यापाठोपाठ झांजपथक, शिंग, तुतारीवाले होते. मध्यभागी फुलांनी सजविलेल्या रथात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विठ्ठल- रक्‍मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार कांताताई नलावडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेनेचे नेते महेश शिंदे, जावळीचे नेते सौरभ शिंदे, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे, माजी नगरसेवक विजय नाफड, अमित कुलकर्णी आदींसमवेत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे विराजमान झाले होते.

रॅलीत सहभागी झालेले हजारो समर्थक नेत्यांचा जयघोष करीत होते. राजपथावरून रॅली मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांना नेते अभिवादन करीत होते. नागरिकही नेत्यांना शुभेच्छा देत होते. फटाक्‍यांच्या आतषबाजीत तसेच समर्थकांच्या जयघोषात रॅली कमानी हौद येथे आली. तेथून रॅली गुरुवार पेठमार्गे शेटे चौक, मल्हार पेठ, पोलिस मुख्यालय, गिते बिल्डिंगमार्गे पोवई नाका येथे आली. पोवई नाक्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सर्व नेत्यांनी अभिवादन केले.

त्यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय...उदयनमहाराज की जय...शिवेंद्रसिंहराजे की जय...'असा जयघोष करण्यात आला. या रॅलीत नक्षत्र संस्थेच्या अध्यक्षा दमयंतीराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य यांच्यासह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोवई नाक्‍यावर रॅलीच्या समारोपानंतर उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे हे मान्यवरांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. 

सातारा होणार स्मार्ट सिटी : राजमाता 

साताऱ्याची "पेन्शनर्स सिटी' म्हणून ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "स्मार्ट सिटी' या धर्तीवर साताऱ्याची जडघडण करण्याचा मानस असल्याची भावना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी अदालत राजवाडा येथे जाऊन ज्येष्ठ नेते शिवाजीराजे आणि चंद्रलेखाराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले, तसेच रॅलीत दमयंतीराजे आणि वेदांतिकाराजे या सहभागी झाल्या होत्या. राजघराण्यातील दोन्ही नेते एकाच वेळेस निवडणूक लढवत असल्याने सातारकरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. ठिकठिकाणी नेत्यांना हार, फुले, कंदी पेढे देऊन शुभेच्छा देण्यात येत होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje - ShivnderaSinghraje filled their election form