उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूर दाैऱ्यात राजकिय भूकंपाची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूर दाैऱ्यात राजकिय भूकंपाची शक्यता

कोल्हापूर - जिल्ह्यातील राजकारणाला येत्या आठ दिवसांत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. ‘दक्षिण’, ‘उत्तर’, पूर्व-पश्‍चिमची सर्वच गणिते बदलली तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १८ खासदारांसह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. याचवेळी त्यांच्याकडून काहींना शुभेच्छाही मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शुभेच्छांच्या निमित्ताने येथे राजकीय भूकंपाचे धक्के जिल्ह्यात बसण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापुरात खासदार शिवसेनेचा झाला पाहिजे, हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. यावर्षी शिवसेनेने कोल्हापूर आणि हातकणंगलेतून दोन खासदार दिले. या बदल्यात अनेकांची मदत झाली. कोणी विधानसभा समोर ठेवून ‘ठरवलं’,  तर कोणी विरोधकांना विरोध म्हणून सहकार्य केले. जिल्ह्यातून दोन खासदार शिवसेनेने दिल्याने इतिहासात त्याची नोंद झाली; मात्र, याची परतफेड करण्याचे ‘काउंट डाऊन’ आता सुरू झाले आहे. ८ जूनच्या सुमारास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १८ खासदारांसह कोल्हापुरात येत आहेत. विजयी सर्व खासदारांना घेऊन ते सध्या देवदर्शनास बाहेर पडले आहेत. त्यांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर पुढील दौऱ्यात ते पंढरपूर, तुळजापूर, अंबाबाई, अयोध्या (वाराणसी) येथे जाणार असल्याचे समजते. ते जेव्हा कोल्हापुरात येतील तेव्हा त्यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरेही असतील.

कोल्हापुरातील घडामोडींवर ते येथे भाष्य करतील किंवा नाही; मात्र विधानसभेची गोपनीय चर्चा होईल, असे कळते. यापूर्वी नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता युवा नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची शक्‍यता आहे. निमित्त कोणतेही असो; मात्र होणारी चर्चा नक्कीच विधानसभेसह जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारीच असू शकते. सर्व खासदारांसह पक्षप्रमुख कोल्हापुरात आल्यानंतर ते कोठे कोठे जाणार?, कोणाकोणाला भेटणार?,  प्रेमापोटी, सहकार्य केल्यामुळे ते कोणाच्या घरी जाणार काय ? यावर भविष्यातील विधानसभेचे संकेत अवलंबून आहेत. त्यामुळे हा दौरा कोल्हापूरच्या राजकारणाला कलाटणी देण्याची शक्‍यता आहे. 

काय काय ‘ठरलंय’ हे पुढे येईल
विधानसभा लक्ष्य ठेवून २०१९ मध्ये कोणाकोणाचे काय काय ‘ठरलंय’ हे लवकरच पुढे येईल. एकाच घरात दोनतीन पक्षांचे नेते असल्याचे यापूर्वी कोल्हापूरकरांनी अनुभवले आहे. कोण ‘आपला माणूस’ म्हणत होते, तर कोण आम्ही राजे म्हणत होते. आता पुन्हा एकदा नव्याने याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली तर नवल वाटायची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com