उदयनराजेंकडून मुलाच्या अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

वीरप्रतापच्या यशाबद्दल उदयनराजेंनी त्याचे कौतुक करत म्हटले आहे, की मी माझ्या मुलाला असे ट्रेंड केले आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायव्हिंग त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा अभिमान आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मुलाने कौतुकास्पद कामगिरी केली असून, स्वतः उदयनराजेंनीही मुलाचे कौतुक केले आहे.

उदयनराजे यांचा मुलगा वीरप्रताप याने थायलंडमधील फुकेट येथे झालेल्या आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाणपत्र मिळविण्याची कामगिरी केली आहे. वीरप्रताप आणि त्यांची आई दमयंतीराजे यांना स्कुबा डायव्हिंगचा छंद आहे. वीरप्रताप याला स्कुबा डाईव्हचा छंद वाढत गेला आणि त्याला अल्माज हिरानी यांनी शिकवायला सुरवात केली. नुकत्याच या निमित्ताने थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र मिळवले. या स्पर्धेवेळी दमयंतीराजेही उपस्थित होत्या. 

वीरप्रतापच्या यशाबद्दल उदयनराजेंनी त्याचे कौतुक करत म्हटले आहे, की मी माझ्या मुलाला असे ट्रेंड केले आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायव्हिंग त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा अभिमान आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale son Virpratap gets certificate in scuba diving