पवारांनी कॉलरचे अनुकरण केले, अजून काय पाहिजे: उदयनराजे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

राजेशाही असती तर... 
राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. भोसले म्हणाले, ""मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करू शकत नाही. मात्र, राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून ठणकावून सांगितले असते. मी त्यांना निमंत्रण देतो. मात्र, ते मला निमंत्रणच देत नाहीत. 

कऱ्हाड : "कोणी काहीही म्हणो, राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल. जरी नाही मिळाली, तरी मी कसा थांबेन? असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे केले. शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय असून, मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या "कॉलर'चे अनुकरण केले, अशीही मिश्‍कील टिप्पणीही त्यांनी केली. 

लोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार श्री. भोसले आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक हणमंत पवार, विजय यादव उपस्थित होते. लोकसभेची तयारी काय करायची? काम करत राहायचे हे मी ठरवले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, ""ज्यांना अर्ज भरायचा आहे, त्यांनी भरावा. लोकशाही आहे. पण, लोकांचा आग्रह मी भरावा म्हणून आहे. त्यामुळे मी कसा थांबेन? राष्ट्रवादीची उमेदवारी मलाच मिळणार. सध्या कोणी काहीही बोलतेय, मी शांत बसलो म्हणून मी काय बांगड्या भरलेल्या नाहीत.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उडवलेल्या कॉलरबाबत ते म्हणाले, "शरद पवारसाहेब आदरणीय आहेत आणि मी त्यांना मानतो. आज या वयातही ते मोठ्या प्रमाणात काम करतात. सकाळी सात वाजता कामासाठी ते कार्यालयात तयार असतात. मी त्यांचे अनुकरण करतो. मात्र, त्यांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. कुणीतरी दाद दिली, हे बास झाले. अजून काय पाहिजे?'' 

कऱ्हाड-चिपळूण रेल्वेबाबत ते म्हणाले, "सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना या मार्गाला गती मिळाली होती. मात्र, सध्या बुलेट ट्रेनची चलती आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे? बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर पैसे खर्च करणे आवश्‍यक आहे.'' 
विकासकामांचे प्रस्ताव द्या, असे मी कऱ्हाड पालिकेला अनेकदा सांगितले आहे. मात्र, ठराव दिले जात नाहीत. मुख्याधिकारी काय करतात? लोकांनी त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

राजेशाही असती तर... 
राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी मारली, याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. भोसले म्हणाले, ""मी सर्वांना निमंत्रण दिले होते. लोकशाहीतील सर्व आमदार राजे आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांना येण्यासाठी फोर्स करू शकत नाही. मात्र, राजेशाही असती तर त्यांना आलेच पाहिजे म्हणून ठणकावून सांगितले असते. मी त्यांना निमंत्रण देतो. मात्र, ते मला निमंत्रणच देत नाहीत. 

Web Title: Udyanraje Bhosale talked about Sharad pawar