'स्वच्छ भारत अभियान' आता अभ्यासाचा विषय

शीतलकुमार कांबळे
सोमवार, 26 मार्च 2018

देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांना युजीसीने विनंती केली आहे. स्वच्छ
भारत अभियान हा वैकल्पिक विषय आपल्या विद्यापीठ, महाविद्यालयात सुरू
करण्यात यावा. तसेच विद्यापीठांनी आपल्या संलग्न महाविद्यालयांना हा
विषय सुरू करण्याची मागणी केली आहे

सोलापूर - स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्वच्छ भारत अभियान या वैकल्पिक विषयास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम फक्त थिअरी पद्धतीने न राहता प्रॅक्‍टीकली स्वरूपात आणण्यात येणार आहे.

युजीसीच्या 530 व्या बैठक 20 मार्च रोजी झाली. या बैठकीत सीबीसीएस (चॉईस
बेस्ड क्रेडिट सिस्टिम ) प्रणालीमध्ये स्वच्छ भारत अभियान या विषयाचा
अंतर्भाव करण्यात आले आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा
वैकल्पिक विषय असणार आहे. या विषयामध्ये 15 दिवसाचे (100 तास) इंटर्नशिप
विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. इतर विषयाप्रमाणे या विषयाला दोन
क्रेडिट गुण देण्यात येणार आहेत.

उन्हाळ्यामध्ये घेण्यात येणाऱ्या इंटर्नशिपमध्ये ग्रामीण भाग, झोपडपट्टी
भागात स्वच्छता अभियान घ्यायचे आहे. यासोबतच स्वच्छ केलेला भाग कायमचा
स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष द्यायचे आहे. या इंटर्नशिपमधुन
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे भारतातील
शिक्षणाचा स्तर देखिल उंचावणार आहे.

देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांना युजीसीने विनंती केली आहे. स्वच्छ
भारत अभियान हा वैकल्पिक विषय आपल्या विद्यापीठ, महाविद्यालयात सुरू
करण्यात यावा. तसेच विद्यापीठांनी आपल्या संलग्न महाविद्यालयांना हा
विषय सुरू करण्याची मागणी केली आहे. युजीसीने स्वच्छ भारत- स्वस्थ भारत
करण्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन
केले आहे. यामुळेच भारत देश स्वच्छ भारत होईल.

महाविद्यालय व विद्यापीठांनी हा वैकल्पिक विषय येत्या शैक्षणिक
वर्षापासून (2018-19) सुरू करावा. तसेच विद्यार्थ्यांमध्ये या नव्या
विषयाबाबत जागरूकता वाढविण्यास सांगितले आहे. ज्यामुळे अधिकाधिक
विद्यार्थी हा विषय घेतील.

Web Title: UGC makes swachh bharat abhiyan a separate paper