उंडाळकर- भोसलेंची आघाडी तुटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रयत संघटना कऱ्हाड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून मिळेल त्या चिन्हावर लढवेल, अशी माहिती माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर व आघाडीचे अध्यक्ष पतंगराव माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या घोषणेने कृष्णा कारखाना आणि बाजार समितीच्या निवडणुकीत उदयाला आलेली उंडाळकर-भोसले गटाची रयत-सहकार आघाडी तुटल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रयत संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, वसंतराव जगदाळे, जगन्नाथराव मोहिते आदी उपस्थित होते. कऱ्हाडमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती लढत आहे. निकोप लोकशाहीच्या संरक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन करून श्री. उंडाळकर म्हणाले, ""कुणाचा पराभव करण्यासाठी आघाडी नाही. सत्तेची दालने सामाजिकदृष्ट्या सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात पोचवण्यासाठी आमची भूमिका आहे. कार्यकर्त्यांनी स्वबळावर काम करण्याचा नवीन आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. कितीही धनाढ्य असले, तरी जनशक्ती त्यांना रोखू शकते, हे दाखवून देण्यासाठी आम्ही स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणार आहोत. गेली दीड वर्ष आम्ही कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणमध्ये कार्यरत आहोत. आमची आघाडी अभेद्य आहे. काही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही राजकारण करत आहोत. हा प्रवास खडतर आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही जमिनीवर आहोत. आमचा विचार पक्का असून, आघाडीच्या चिन्हावर आम्ही लढणार आहोत.''

मागे आम्ही एकत्रित लढवलेल्या निवडणुका सहकारी संस्थेच्या होत्या. सध्याच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जात आहेत. वेळ आल्यावर अनेक पत्ते खुले केले जातील, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले. पतंगराव माने यांनी कऱ्हाड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून यावेळच्या निवडणुका मिळेल त्या चिन्हावर लढवल्या जातील, असे स्पष्ट केले.

"हे त्यांनाच विचारा'...
कऱ्हाड तालुक्‍यात रयत- सहकार संघटनेच्या माध्यमातून उंडाळकर- भोसले गट एकत्र आले होते. यावेळच्या निवडणुका कऱ्हाड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा उंडाळकरांनी केली. त्यावर आघाडी का तुटली असे विचारले असता उंडाळकर यांनी "हे त्यांनाच विचारा,' असे सांगून अधिक बोलणे टाळले.

Web Title: undalkar-bhosale broken lead