राजकीय उदासीनतेत लटकले भुयारी वायरिंग

शिवाजी यादव
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावर वीज तारांचे जंजाळ आहे, अपघात घडतात, जीवित हानी होते, वर्षानुवर्षांच्या तारांचा धोका कमी करण्यासाठी भुयारी वायरिंगसाठी २२ कोटींचा निधी महावितरण कंपनीकडे आला. पण महापालिकेने परवानगी दिली नाही म्हणून काम सुरू झाले नाही. 

कोल्हापूर - शहराच्या डोक्‍यावर वीज तारांचे जंजाळ आहे, अपघात घडतात, जीवित हानी होते, वर्षानुवर्षांच्या तारांचा धोका कमी करण्यासाठी भुयारी वायरिंगसाठी २२ कोटींचा निधी महावितरण कंपनीकडे आला. पण महापालिकेने परवानगी दिली नाही म्हणून काम सुरू झाले नाही. 

अशी स्थिती असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘ब्र’ काढलेला नाही. महापालिकेत ज्यांची सत्ता आहे ते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ चिडीचूप आहेत. ज्यांच्या मतदारसंघात काम होणार आहे, असे शहराचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यापर्यंत विषय पोचला की नाही याची शंका आहे. अशा राजकीय दुर्लक्षात महापालिकेला कोणीही जाब विचारलेला नाही. परिणामी आलेला निधी परत जाण्याचा धोका कायम आहे. 

शहरातील धोकादायक वीजवाहक तारा भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारच्या एकात्मिक विद्युत विकास योजनेकडून २२ कोटी रुपयांचा निधी महावितरणला आला आहे. त्यासाठी रस्ते खोदण्यासाठी महापालिकेने महावितरणकडे बारा कोटींचा खर्च मागितला. महावितरणने पाच ते सहा कोटी देण्याचे मान्य केले, तरीही महापालिकेने कोणतीच ठोस भूमिका न घेता रस्ते खोदाईला परवानगी दिलेली नाही. परिणामी वीज तारांचा जीवघेणा धोका कायम आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर महावितरण ते महापालिका यांच्यात फक्त चर्चा व पत्र व्यवहार झाले. पण कोणतेही काम झालेले नाही. वास्तविक पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र तसा प्रयत्न अभावानेच झाला. महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक जास्त आहेत. त्यांचे नेतृत्व आमदार सतेज पाटील करीत आहेत. त्यांनी त्यांच्या महापौर व नगरसेवकांना या प्रश्‍नी लक्ष घालण्याची सूचना दिली तर यावर तोडगा निघू शकतो. शिवसेनेचे नगरसेवक महापालिकेत आहेत. त्यांनाही हा विषय लावून धरावा, असा आग्रह क्षीरसागर यांनी कितपत केला याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे. आमदार क्षीरसागर यांच्याच मतदारसंघातील बहुतांशी भाग आहे. तरीही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वास्तविक दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात शहराचा बहुतांशी भाग आहे. 

तेथे वीज तारांचा धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत ४२ गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे वीज तारा भुयारी मार्गाने फिरवणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांसह आमदारांनी मनावर घेऊन पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. विजेचा धोका डोक्‍यावर घेऊन शहरात फिरावे लागत आहे.

अशात निधी परत गेल्यास भविष्यात होणाऱ्या वीज अपघातांचे खापर महापालिकेवर फुटणार आहे. महावितरण उच्च अधिकारी व महापालिका आयुक्त, महापौर यांच्यात फक्त चर्चा झाल्या. अखेर महावितरण कंपनीने पाच-सहा कोटीपर्यंतची भरपाई देण्याची तयारी दर्शविली. तरीही महावितरण परवानगी दिलेले नाही. परिणामी भुयारी वायरिंगचे काम बारगळल्यात जमा आहे.

मुदत सप्‍टेंबरपर्यंतच
महावितरणला भुयारी वायरिंग कामासाठी आलेला २२ कोटींचा निधी येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत खर्च करण्याची मुदत आहे. त्या कालावधीत महापालिकेची परवानगी मिळाली नाही तर हा सर्व निधी परत जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पालकमंत्री तसेच शहरातील दोन आमदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

वीज तारा जीवावर बेतल्या 
गतवर्षी महाद्वार रोडवर वीज तारेला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ कसबा बावड्यात घराशेजारील वीज तारेस स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून युवतीला जीव गमवावा लागला. उमा टॉकीज येथील तारांच्या जंजाळातील विजेचे दोष काढताना वायरमन गंभीर जखमी झाला तर रमणमळा परिसरात वीज तारा तुटून चार म्हशी दगावल्या. असे जवळपास ४२ गंभीर अपघात शहरात घडले आहेत.

Web Title: Underground Electricity Wiring Issue