खासदार महाडिक 2019 ला केंद्रीय मंत्री - चंद्रकांतदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

कोल्हापूर - खासदार धनंजय महाडिक हे लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री असतील, असे सूचक विधान जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. राष्ट्रवादीचे खासदार असलेले खासदार श्री. महाडिक यांच्या विषयीच्या या विधानामुळे श्री. महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. तसेच याबाबतची पोस्टही डिजिटल मीडियावर व्हायरल झाली. 

महालक्ष्मी मंदिरात सोमवारी सुवर्ण पालखी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या पालखीसाठी खासदार श्री. महाडिक यांनीच पुढाकार घेतला होता. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पालखी देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी श्री. महाडिक यांच्या कार्याचा गौरव केला. 

पाटील म्हणाले, ""खासदार महाडिक हे निस्वार्थी आहेत. त्यांच्याकडे काम करण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्यांचे कार्य आदर्श असून त्यामागे त्यांचे अविरत कष्ट आहे. या जोरावरच ते खासदार झाले. 2019 नंतर श्री. महाडिक हे आपल्या कार्याच्या जोरावर केंद्रीय मंत्री होतील.'' 

पालकमंत्री श्री. पाटील यांचे भाषण झाल्यानंतर त्यांचे भाषण डिजिटल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे खासदार महाडिक हे 2019 चे भाजपचे जिल्ह्यातून उमेदवार असतील, अशी शक्‍यताही वर्तवण्यास सुरवात झाली. 

मुळात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना श्री. महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर वादळात दिवा तेवत ठेवून विजयश्री मिळवली. अलीकडील काही दिवसांपासून त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. 2019 ला ते भाजपचे उमेदवार असतील. म्हणूनच श्री. पाटील यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिपदही देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

महाडिक गटाची मदत 
श्री. महाडिक यांचे एक चुलतभाऊ भाजपचे आमदार आहेत, भावजय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तसेच आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटाच्या राजकीय लढाईत भाजपने नेहमीच महाडिक गटाची साथ केली आहे. महाडिक गटाची ताकद भाजपला जिल्ह्यात आपला पक्ष मजबूत करण्यास मदत देत असल्याने पालकमंत्री श्री. पाटील यांनी खासदार महाडिकांना 2019च्या लोकसभेसाठीचे सुतोवाच वर्तवले आहे. 

Web Title: Union Minister of Parliament Mahadik 2019