कालवडीची गाय करा अन्‌ पैसे मिळवा

A unique initiative by the Satyajit Kadam Mitra Mandal
A unique initiative by the Satyajit Kadam Mitra Mandal

राहुरी : शेतकरी, शेतमजुरांना गायीचे वासरू (कालवड) सांभाळण्यासाठी द्यायचे. एक-दीड वर्षाने ते गर्भवती राहिल्यावर गायीची विक्री करायची. त्यातून मिळालेली अर्धी रक्कम गाय सांभाळणाऱ्या शेतकरी, शेतमजुराला द्यायची... असा आदर्श उपक्रम सत्यजित कदम मित्रमंडळातर्फे देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे काल (बुधवार) पासून सुरू झाला. आजअखेर चाळीस गायी शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी देण्यात आल्या. 

या उपक्रमाविषयी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी "सकाळ'ला सांगितले, ""आगामी वर्षभर हा उपक्रम सुरू राहील. एक हजार गायी शेतकऱ्यांना सांभाळण्यासाठी देण्याचा मानस आहे. मागील वर्षी तीव्र दुष्काळामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी गोठ्यातील गोधनाची नाइलाजाने विक्री केली. शेतकऱ्यांचे गोठे रिकामे झाले. गोधन विक्रीतून आलेला पैसा खर्च झाला. 

मित्रांनी निधी उभा केला 
शेतमजुरांची हीच परिस्थिती झाली. यंदा निसर्गाने कृपा केली. चांगला पाऊस झाला. ओढे-नाले वाहिले. शेतातील विहिरी, कूपनलिकांचे आटलेले पाणी परत आले. शेतात चारापिके डौलाने उभी राहिली. परंतु गोठा रिकामा. खिसे रिकामे. गोधन खरेदी करण्याची आर्थिक स्थिती नाही. अशा शेतकरी, शेतमजुरांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील व शहरातील सधन मित्रमंडळींना उपक्रमाची माहिती दिली. त्यासाठी सर्व मित्रांनी निधी गोळा केला.'' 

शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद 
शहरातील काही मित्रांनी मोफत गायवाटपाची संकल्पना मांडली. परंतु शेतकरी स्वाभिमानी आहे. कष्टाची भाकरी खाणारा आहे. त्यामुळे फुकट गायवाटपाऐवजी त्यांना सांभाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला. ज्या मित्रांनी पैसे गुंतविले, त्यांना गायींच्या विक्रीनंतर त्यांची मूळ रक्कम अधिक बॅंकेच्या व्याजदराप्रमाणे रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या मित्रांची रक्कम सुरक्षित राहून, गरीब शेतकरी, शेतमजुरांच्या आर्थिक प्रगतीत वाटेकरी होण्याचे समाधान लाभणार आहे. उपक्रम जाहीर करताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे, असेही कदम यांनी सांगितले. 

अर्धी रक्कम विक्रीनंतर 
सात महिन्यांची कालवड सांभाळण्यासाठी घेतली आहे. शेतात चारा, पाणी व गोठा आहे. विक्रीयोग्य होईपर्यंत दोन वर्ष गाय सांभाळणार आहे. विक्रीनंतर अर्धी रक्कम मिळणार आहे. उपक्रम स्तुत्य आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार लाभेल. 
- अक्षय ढूस, लाभार्थी, देवळाली प्रवरा 

शेतकरीहिताचा उपक्रम 
पहिल्या दोन गायी व एक कालवड आहे. शेतात घास व गिन्नी गवत आहे. आणखी एक कालवड सांभाळण्याची क्षमता आहे. त्यामुळे या उपक्रमातून सहा-सात महिन्यांची कालवड सांभाळण्यासाठी घेतली आहे. विक्रीयोग्य होईपर्यंत सांभाळून, बाजारमूल्याच्या निम्मी किंमत देऊन, ही गाय खरेदी करण्याचा विचार आहे. शेतकरीहिताचा हा आदर्श उपक्रम आहे. 
- बाळासाहेब कडू, लाभार्थी, देवळाली प्रवरा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com