आरारा... कांदा तिखटच! 

आनंद गायकवाड 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

प्रत्येक घराच्या स्वयंपाकगृहात अत्यावश्‍यक असलेला कांदा मोठी किंमत मोजून आणावा लागत आहे. त्यामुळे कांद्याचे घरगुती भाजीतले प्रमाणही घटले आहे. 

संगमनेर : एरवी कापताना डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कांद्याच्या भावाने आता ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. परतीच्या पावसाने तालुक्‍यातील कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या पठार भागातील कांदाउत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या वेळी या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रू तरळले. मात्र, या अस्मानी संकटातून वाचलेल्या कांद्याला आता विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत आहेत. शहरातील बहुतेक उपाहारगृहातून कांदा गायबच झाल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा हरणांचा बाजार शेतकरी बेजार! 

शहरातील अनेक प्रसिद्ध उपाहारगृहे, खानावळी, मिसळ, भेळ, कांदा-पोहे, भजीविक्रीच्या स्टॉल्सवर सहज मिळणारा कांदा गायबच झाला आहे. त्या जागी आता कोबीपत्ता, काकडी, टोमॅटो दिला जात आहे. बाजारात कांद्याची मागणी वाढली असताना, त्या तुलनेत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्याने लाल कांदा पिकाची मोठी हानी झाली. त्यातून वाचलेला कांदा आता बाजारात आला आहे. प्रतवारीप्रमाणे त्यास भाव मिळत असला, तरी तो विक्रमी आहे. 

पत्ताकोबीचा सर्रास वापर

राज्यातील सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे भेळ. भेळ भत्त्याबरोबर कांदा तर हवाच, त्या शिवाय खवय्यांचे समाधान होत नाही. केवळ कांद्याची बनवलेली खेकडा भजी, गोल कांदाभजी, कांदा पोहे, पावभाजी या पदार्थांचाही खास खवय्या वर्ग आहे. मात्र, चढ्या भावामुळे विक्रेत्यांनी कांद्याच्या जोडीला किंवा त्याऐवजी भज्यांत कांद्याची पात व पत्ताकोबीचा सर्रास वापर सुरू केला आहे. जिभेचे चोचले पुरविणारा कांदा काही दिवस तरी खवय्यांसाठी दुर्मिळच राहणार असल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. 

हेही वाचा सुपा एमआयडीसीत थर्माकोलचा तलाव 

दर्जा टिकविण्यासाठी कांद्याचा वापर 
संगमनेर शहरातील जवळपास सर्व उपहारगृहांना विविध भाज्यांसाठी मसाला पुरविताना त्यात कांद्याचा वापर अपरिहार्य असतो. आतासारखी कांदा दरवाढीची परिस्थीती नेहमी येत नाही. आपल्या उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी दरवाढीकडे दुर्लक्ष करुन कांदा वापरला जातो. 
- राकेश राऊळ, मसाला उत्पादक 

दरवाढ टिकण्याची शक्‍यता कमीच 
या वर्षी परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातला कांदा सडून वाया गेल्याने, केवळ पाच ते दहा टक्के पिक हातात आले. या पार्श्वभूमीवर मागणीपेक्षा उत्पादन घटल्याने, ही दरवाढ झाली आहे. यातून काही टक्के शेतकऱ्यांना लाभ होणार असून, ही दरवाढ फार काळ टिकणार नाही. मात्र, मिळालेल्या या अनपेक्षित लाभामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. 
- मच्छिंद्र गुंजाळ, शेतकरी 

हेही वाचा आम्हाला आधारभूत केंद्र पाहिजे 

कांद्याला पर्याय नाही 
मौज म्हणून कांदाभजी, ओली सुकी भेळ, चमचमीत मिसळ, पावभाजी खाणारा मोठा ग्राहकवर्ग आहे. कांदा या पदार्थांची चव वाढवतो. अनपेक्षित दरवाढीमुळे काही उरपहारगृहात कांद्याची पात, कोबी पत्ता या सारख्या पर्यायी पदार्थांचा वापर होत असला तरी, कांद्याला हे पदार्थ पर्याय होऊ शकत नाहीत. 
- हेमंत पोटे, ग्राहक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onions disappear from the hotel