पंजांसाठी तुर्रे-शेरे बांधणीचा तीन पिढ्यांचा वारसा (व्हिडिओ)

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मोहरम सणानिमित्त निघणाऱ्या पंजा व ताबूत मिरवणुकांसाठी तुर्रे व शेरे बांधणीचा वारसा सोलापुरातील इनामदार कुटुंबीयांनी भक्तिभावाने जोपासला आहे. तीन पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय आजही मोठ्या श्रद्धेने पुढे अविरत चालू आहे

सोलापूर : मोहरम सणानिमित्त निघणाऱ्या पंजा व ताबूत मिरवणुकांसाठी तुर्रे व शेरे बांधणीचा वारसा सोलापुरातील इनामदार कुटुंबीयांनी भक्तिभावाने जोपासला आहे. तीन पिढ्यांपासूनचा हा व्यवसाय आजही मोठ्या श्रद्धेने पुढे अविरत चालू आहे.

सोलापूर शहरातील विजयपूर वेस येथील इनामदार फ्लॉवर मर्चंटचे  राजअहमद इनामदार व त्यांचे कुटुंबीय हा व्यवसाय सांभाळत आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचा संदेश देणाऱ्या मोहरम सणानिमित्त शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी पंजा व ताबूतची प्रतिष्ठाना केली जाते. सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वत्र पंजा व ताबूतची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात केली आहे. मोहरममध्ये पाच दिवस पंजा व ताबूतच्या भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. मिरवणुकीवेळी पंजांची तुर्रे व शेरे लावून सजावट करण्यात येते. हे तुर्रे व शेरे बांधणीचा व्यवसाय इनामदार कुटुंबीयांनी मागील तीन पिढ्यांपासून जोपासला आहे. 

 

राजेसाहेब इनामदार यांनी सुरू केलेला हा व्यवसाय पुढे महंमदसाहेब इनामदार यांनी चालविला. आता राजअहमद इनामदार हा व्यवसाय सांभाळत आहेत. याकामी त्यांना इरफान इनामदार, वसीम इनामदार, तजम्मूल इनामदार, दिशान शापुरे व कुटुंबातील सर्व सदस्य मदत करीत आहेत. मोहरमच्या सुमारे एक महिना आगोदर तुर्रे व शेरे बांधणीसाठी कामट्यांपासून साठे बनविले जातात आणि मोहरम मिरवणुकांच्या आठवडाभरात चमकी, बेगड, जर लावून त्याची सजावट केली जाते. 

तुर्रे-शेरे बांधणीसाठी काळानुरूप आकर्षक डिझाईन करण्याचा प्रयत्न होतो आहे. बदाम, किलावर डिझाईन, तीन व पाच कळीची डिझाईन असे आकर्षक तुर्रे तयार करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांतून व कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही यांना मोठी मागणी आहे. - राजअहमद इनामदार (इनामदार फ्लॉवर मर्चंट, सोलापूर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unique legacy of a inamdar family in solapur