अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल; रब्बी पिकांसह फळबागांना फटका

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल; रब्बी पिकांसह फळबागांना फटका

सातारा ः सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, माण, खटाव, वाई, फलटण तालुक्‍यांतील काही भागांत रविवारी (ता.एक मार्च) दुपारी ढगांच्या गडगडाटात वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पावसाने झोडपून काढले. म्हसवड परिसरात काही भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसह द्राक्षांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहरही झडला.
 
गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवेत कमालीचा उकाडा असूनही पाऊस झाला नाही. आजही दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसास सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. त्यातही माण व फलटण तालुक्‍यांत पावसाची तीव्रता जास्त होती. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या रब्बी हंगामातील विविध पिकांची काढणी सुरू आहे. त्यातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची कापणी करून ती शेतातच पसरून ठेवली आहेत. ही सर्व पिके पावसात भिजली. माण तालुक्‍यात म्हसवड परिसरात पावसाची तीव्रता जास्त होती. त्यात रब्बी पिकांसह उशिरा पेरणी केलेल्या पिकांनाही फटका बसला. बागांतील द्राक्षांच्या घडांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सायंकाळी सहानंतर पावसाने पुन्हा सुरवात केली. कुकुडवाड परिसरातही चांगला पाऊस झाला. बिजवडी परिसरातील काही गावांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतात कापून ठेवलेली ज्वारीची कणसे, कडबा, कांदा भिजला. वाई तालुक्‍यात सुरूर व परिसरात पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पावसाने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 
फलटण तालुक्‍यात सांगवी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातीत गहू भुईसपाट झाला आहे. रब्बी पिकांबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. उंडाळे व कातरखटावमध्ये आज आठवडा बाजार होता. अचानक झालेल्या पावसाने बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. बाजारात उघड्यावर ठेवलेला माल भिजल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. 

वाचा : Video : साताऱ्यात पाच घरांसह दुकान फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

संसारोपयोगी साहित्यावर पाणी 

सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने ठिकठिकाणी ऊसतोडी सुरू आहेत. उंडाळे परिसरात तोडलेला ऊस शेतातच ठेवण्यात आला आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतात ओल निर्माण झाली आहे. त्यामुळे तोडलेला ऊस शेताबाहेर कसा काढायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.

सातारा  : गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाढलेल्या उष्णतेनंतर आज दुपारी माण, खटाव, फलटणसह कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची पुरती धांदल उडाली. 
बिजवडी : माण तालुक्‍याच्या बिजवडी, राजवडी, पाचवड, अनभुलेवाडी, जाधववाडी आदी गावांत दुपारी सव्वातीनच्या दरम्यान रिमझिम तर कधी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. उन्हाळा सुरू झाल्याने पावसाची कोणतीच शक्‍यता नसताना आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक पावसाने दमदार तर कधी रिमझिम हजेरी लावली. त्यामुळे शेतात ज्वारी, कांद्याची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. ज्वारीची कणसे, कडबा, कांदा उघड्यावरच असताना अचानक झालेल्या पावसाने तो भिजून गेला. तो झाकण्यासाठी तसेच गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली. थोड्याच वेळात पावसाने पाणी पाणी केल्याने अनेकांना गरम वातावरणात गारवा मिळाला तर बहुतांश जणांना "आता हा का आला अचानक' म्हणून वाईट वाटले. पंधरा मिनिटे पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात चांगलाच थंडावा तयार झाला. त्याचा फटका बहर धरलेल्या फळबागांनाही बसण्याची शक्‍यता आहे. 

म्हसवडला झोडपले 

म्हसवड : माण तालुक्‍याच्या पूर्व भागातील म्हसवड, पुळकोटी, बनगरवाडी, जांभुळणी, भाटकी, खडकी, कारखेल आदी गावांच्या परिसरात आज दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्यावरूनही पाणी वाहू लागले. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या उभ्या पिकांना मात्र या पावसाचा फटका बसला. उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी, बाजरीची पिके फुलोऱ्यात असून या पिकांच्या कणसांवरील फुलोरा पावसामुळे झडून गेला. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. द्राक्ष बागांच्या घडाचेही या पावसाने नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याची झाडे मोहराने फुलून गेली असताना तो झडण्याचाही प्रकार घडला. 

हेही वाचा : बापरे ! तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न 

फलटणला नुकसान 

सांगवी : फलटण तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सांगवी परिसरात सोमंथळी, सांगवी, अलगुडेवाडी, माळवाडीसह अनेक ठिकाणी वादळी पावसाने गहू, ऊस, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. ऐन काढणीला आलेल्या ऊस, मका, गव्हाची पिके भुईसपाट झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गडगडाट करत वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने मोहरलेल्या आंब्याचेही नुकसान झाले. तसेच भाजीपाल्यालाही फटका बसला. 

कऱ्हाड-पाटणला त्रेधातिरपीट 

कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण तालुक्‍याच्या विविध भागात आज वादळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून हवेत वाढलेल्या उष्म्याने हैराण झालेल्यांना या पावसानंतर दिलासा मिळाला. दरम्यान पावसाने काही ठिकाणी आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले तर गव्हासह रब्बीतील काढणीला आलेल्या पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
 
जरुर वाचा : अजित पवार आणणार कराडला औद्योगिक कॉरिडोर ?

उंडाळे : परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. आज उंडाळे येथील आठवडा बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यांची, ग्राहकांची तारांबळ उडाली. काही व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. व्यापाऱ्यांनी माल झाकण्यासाठी साहित्यही आणले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांची व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या परिसरात ऊस तोडणी सुरू आहे. शेतात तोडलेला ऊस कसा बाहेर काढायचा, हा प्रश्‍न शेतकरी व ट्रॅक्‍टर चालकांपुढे निर्माण झाला आहे. ऊसतोड मजुरांच्या झोपडीमध्ये असणारे साहित्यही या पावसामुळे भिजून नुकसान झाले. परिसरात शेतकऱ्यांची गहू, ज्वारी आदी पिके चांगली आली होती. परंतु, काढणीला आलेली पिके पावसात भिजल्यामुळे त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

कातरखटावला नुकसानीची घंटा 

कातरखटाव : परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने सुरवात केली. काही वेळातच भागात पाणी पाणी झाले. जवळपास अर्धा तास पाऊस झाला. परिसरात ज्वारी पिकाची काढणी सुरू असून, ज्यांनी ज्वारी काढून रानात पसरून ठेवली आहे, त्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. आंबा, द्राक्ष, हरभरा आदी पिकांनाही फार मोठे नुकसान पोचले आहे. कातरखटावचा आजचा आठवडी बाजारही मोडकळीत निघाला. व्यापारी व ग्राहकांची दैना उडाली.

हेही वाचा : ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com