स्वतःतील ‘एव्हरेस्ट’ शोधा, यशस्वी जीवन जगा - राहुल बोस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जो जो कुणी माणूस म्हणून जन्माला येतो, त्या प्रत्येकाला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी असते. त्याचा शोध घ्यायला शिका. आपल्यातही एक ‘एव्हरेस्ट’ दडलेला आहे आणि त्याच बळावर आपण यशस्वी जगण्यासाठीची लढाई हमखास जिंकू शकतो, असा मौलिक मंत्र बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस यांनी आज दिला. आपल्या आजवरच्या प्रवासातील विविध अनुभवांची शिदोरी रिती करताना त्यांनी सर्वांचीच मनं प्रज्वलित केली. निमित्त होते... सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाचे.

कोल्हापूर - जो जो कुणी माणूस म्हणून जन्माला येतो, त्या प्रत्येकाला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी असते. त्याचा शोध घ्यायला शिका. आपल्यातही एक ‘एव्हरेस्ट’ दडलेला आहे आणि त्याच बळावर आपण यशस्वी जगण्यासाठीची लढाई हमखास जिंकू शकतो, असा मौलिक मंत्र बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस यांनी आज दिला. आपल्या आजवरच्या प्रवासातील विविध अनुभवांची शिदोरी रिती करताना त्यांनी सर्वांचीच मनं प्रज्वलित केली. निमित्त होते... सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत ‘ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमाचे. दरम्यान, हाउसफुल्ल गर्दीच्या साक्षीने या कार्यक्रमाला आजपासून शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात दिमाखदार प्रारंभ झाला. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी हा संवाद खुलवला. 

राहुल बोस हे अभिनयाबरोबरच विविध सामाजिक कार्यातील ‘आयडॉल’. कोल्हापूरच्या बाबतीत अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉ. यशवंतराव थोरात यांचे ते सख्खे भाचे. त्यामुळेच संवादाला सुरवात करतानाच डॉ. थोरात यांनी त्यांना मराठीत बोलण्याची सूचना केली. मात्र, ‘एक साल में पुरी मराठी सिखूंगा और अगले साल मराठी में बोलूंगा’ अशी ग्वाही राहुल यांनी दिली. त्यातही मामा मुलाखत घेत असल्याचे ‘सच और सचके बिना कुछ नही कहूंगा’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले आणि त्यानंतर तब्बल ७० मिनिटे हा संवाद रंगला. राहुल म्हणाले, ‘‘पडद्यावरचा आणि वास्तवातला हीरो हे नक्कीच वेगळे असतात. मात्र, आपण ज्यावेळी एक विशिष्ट भूमिका घेऊन कार्यरत असतो, त्या वेळी तीच सर्वोत्तम केली पाहिजे. ‘स्टार आणि ॲक्‍टर’ यामध्येही बराच फरक असतो. केवळ स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवणारे भरपूर आहेत; पण ‘ॲक्‍टर’ म्हणून ओम पुरी, नसरुद्दीन शहा आणि ‘स्टार व ॲक्‍टर’चा सुवर्णमध्य साधणाऱ्या आमीर खान यांच्या भूमिका पाहायलाच हव्यात. बॉलिवूडमध्ये मुख्य प्रवाहात येऊन भूमिका करण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळे आणि जे मनाला पटेल तेच करण्याची जिगर असल्याने आर्ट फिल्मवर अधिक भर दिला आणि त्या यशस्वीही झाल्या.’’

आदिवासी भागातील १३ वर्षीय पूर्णा मलावत जिगर पणाला लावते आणि एव्हरेस्ट सर करते, ही एक प्रेरणादायी घटना आहे. ‘लडकिया सब कुछ कर सकती है’ हा या घटनेतील मेसेज मला महत्त्वाचा वाटला आणि ‘पूर्णा’ हा चित्रपट तयार केला. तो ३१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, तो सर्वांनी नक्की पाहावा, असे आवाहनही त्यांनी केले. रग्बी संघातून भारताचे प्रतिनिधित्व केले. खेळताना सहा मित्रांना कित्येकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. जिवाला जीव देणारे चार बालमित्र आहेत आणि कुटुंबीयांकडून मिळणारे प्रेम यांचे पाठबळ असल्यानेच विवाहाचा विचार केला नसल्याचेही त्यांनी सांगितले. या साऱ्या संवादात राहुल यांच्या बालपणापासून ते ‘शेक्‍सपिअर’, ‘हेल्मेट’पर्यंतच्या विविध प्रेरणादायी गोष्टींवर विवेचन झाले. 

विकासाची नवी परिभाषा
अंदमानमधील त्सुनामीग्रस्त, काश्‍मीरमधील दहशतवादी परिसरातील आणि मणिपूरमधील विद्यार्थी राहुल आणि त्यांच्या फाऊंडेशनने दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांना शिक्षण दिले जाते. सहावीपासून ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत अशी पंधरा वर्षे फाऊंडेशन या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च उचलते. प्रत्येकाची वार्षिक फीच किमान पाच लाखांच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपापल्या परिसरातच जाऊन जे काही करिअर करायचे आहे ते करावे, अशी त्यांना मुभाही असेल. ही सर्व प्रक्रिया एकूण सहा टप्प्यांतून जाते आणि ती त्या त्या प्रदेशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारी असल्याचे राहुल सांगतात. हजारो मुलांना शिकवण्यापेक्षा काही मोजक्‍याच मुलांना सर्वोत्तम शिक्षण देऊन विकासाची नवी परिभाषा त्यांनी मांडली.

दिमाखदार उद्‌घाटन सोहळा
‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, ‘डीवायपी’ ग्रुपचे शाम कोले, राजुरी स्टीलचे विकास फडतरे, मॉडर्न होमिओपॅथीचे प्रेमकुमार माने, मार्व्हलस इंजिनीअर्सचे गौरव पाटील, पार्थ फाऊंडेशनचे प्रा. उमाकांत वाघमारे, तनिष्क ज्वेलर्सचे प्रसाद कामत, लक्ष्मी सेल्सचे अजित पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन सोहळा झाला. मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी ‘सकाळ’च्या एकूणच वाटचालीचा आढावा घेताना विशेषतः तरुणाईसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘सकाळ’ माध्यम समूहाचा ‘ऊर्जा’ हा कार्यक्रम ज्ञान, विचार केंद्रित विद्यार्थिप्रिय कार्यक्रम असून, तो सर्वांनाच प्रेरणादायी आहे. तरुणाईच्या सळसळत्या ऊर्जेला ध्येयामध्ये परावर्तित करताना संवाद महत्त्वाचा असतो आणि तो ‘ऊर्जा’तून अतिशय उत्तमपणे साधला जातो आहे, असे गौरवोद्‌गार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काढले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

तरुणाईसाठी राहुलज्‌ मंत्रा...!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या भूमिका बदलत असल्या तरी जे काही करायचं ते सर्वोत्तमच, याचा ध्यास ठेवा.
प्रत्येक खेळात लय असते, संगीत असते आणि कविताही असते. तो खेळण्याची जिगर मात्र आपल्यात हवी. 
देशासाठी खेळताना आपल्यासाठी आपले नाव मागे पडते. प्रत्येक खेळाडूची ‘इंडिया’ हिच ओळख असते आणि तीच विजयाची शिल्पकार ठरू शकते.
ग्रेट रिलेशनशिप म्हणजे दुसरे काय ? भरभरून प्रेम इथे मिळायला हवे. जसे लाँग ड्राइव्हला जावेसे वाटते, तशीच आध्यात्मिक आनंदानुभूती देणारी नीरव शांतताही एकमेकांना अनुभवायला मिळाली पाहिजे. 
आपण किती गोष्टींसाठी ‘नाही’ म्हणतो, त्यावरच यशस्वी करिअरचे मापदंड अवलंबून असतात.
आपल्यापुढे एकच ‘आयडॉल’ ठेवण्यापेक्षा प्रत्येक आयडॉलकडून मूठ-मूठभर चांगल्या गोष्टी घ्यायला शिका. त्यातून आपली ‘पर्सनॅलिटी’ परिपूर्ण बनेल. तीच आपल्याला यशोशिखराकडे घेऊन जायला प्रेरणा देत राहील.
स्वतःविषयीचा आत्मशोध घेताना जे जे सत्य आहे, तेच बोला. वास्तव स्वीकारायला शिका. आपोआप मग कधीच खोटं बोलायची वेळ येणार नाही.

सयाजी शिंदेंशी आज रंगणार दिलखुलास गप्पा

‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या कार्यक्रमातील दुसरे पुष्प आज (मंगळवारी) प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे गुंफणार आहेत. मराठीसह कॉलिवूड, टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही सयाजी शिंदे यांच्या अभिनयाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला असून, त्यांचे विविध रंगमंचीय आविष्कारही लक्षवेधी ठरले आहेत. अभिनेत्यामागील स्वतःतील माणूस त्यांनी नेहमीच जपला असून, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळमुक्तीसाठी विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. वनक्षेत्र वाढवण्यासाठी सव्वा लाखांवर झाडे लावून त्याचे जतन व संवर्धन असेल किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत असो, अशा उपक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला आहे. योगेश देशपांडे (पुणे) त्यांच्याशी संवाद साधतील.  

 स्थळ - शिवाजी विद्यापीठ, लोककला केंद्र
 वेळ - सायं. सहा ते रात्री आठ (सर्वांना विनामूल्य प्रवेश)

यांचे विशेष सहकार्य
'डीवायपी’ ग्रुप प्रस्तुत या कार्यक्रमाचे राजुरी स्टील मुख्य प्रायोजक असून, मॉडर्न होमिओपॅथी हेल्थ पार्टनर, मार्व्हलस इंजिनिअर्स, पार्थ फाऊंडेशन, लक्ष्मी सेल्स, तनिष्क ज्वेलर्स, सीएमएम ॲरेना सहप्रायोजक आहेत. युनियन बॅंक बॅंकिंग पार्टनर आहे. राजुरी स्टीलने लोककला केंद्रात ‘लेक वाचवा’ या विषयावर पोस्टर प्रदर्शन भरवले असून, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

Web Title: urja sanvad dhyeyvedyashi event in kolhapur