निधी वापरा, अन्यथा परत करा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कऱ्हाड  - सुमारे पाच वर्षांपूर्वी मंजूर केलेला मात्र पालिकांनी न वापरलेला निधी शासनाकडे जमा करण्याचे आदेश नगरविकास खात्याने दिले आहेत. त्याबरोबर तीन वर्षांपूर्वीचा मंजूर निधी डिसेंबरअखेर न वापरल्यास तोही परत करण्याचे आदेशात म्हटले आहे. "निधी वापरा, अन्यथा परत करा', या नगरविकास खात्याने घेतेलेल्या भूमिकेमुळे पालिकांची पंचाईत झाली आहे. न वापरलेला निधी परत करण्याबरोबरच आलेला निधी वापरण्याचे नियोजनही चार महिन्यांत करावे लागणार आहे. 

पालिकांना तीन वर्षांपूर्वी दिलेला निधी डिसेंबरअखेर न वापरल्यास तो निधी पालिकांकडून पुन्हा परत घेतला जाणार आहे. मंजूर झालेल्या कामांसाठीच तो निधी वापरण्याचे शासनाचे आदेश आहेत. ज्या कामासाठी निधी मंजूर आहे, त्याच कामासाठी न वापरल्यास तो निधी पुन्हा शासन परत मागवून घेणार आहे. त्यामुळे पालिकांपुढे निधी वापरण्याची पंचाईत झाली आहे. हा निधी अद्यापही पडून असल्यास शासनाकडे वर्ग करावा लागणार आहे. 

शासनाने 2015-16 या कालावधीत पालिकांना निधी दिला आहे. त्या निधीबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्या कालावधीतील मंजूर कामांना प्रत्यक्ष अद्यापही वर्कऑर्डर दिल्या नसतील तर तोही निधी शासन वर्ग करून घेणार आहे. 30 जूनपूर्वी वर्कऑर्डर दिली असेल ते काम करण्यास शासनाने मुभा दिली आहे. जिल्ह्यातील पालिकांना आदेश आल्याने पालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही हवालदिल झाले आहेत. वास्तविक शासनाने सुमारे तीन वर्षांपूर्वी 2015-16 मध्ये विविध कामांसाठी पालिकांना निधी वर्ग केला आहे. मात्र, तो निधी अनेक पालिकांनी वापरलेला नाही. काही पालिकांनी वेगळ्या कामासाठी निधी वर्ग केला आहे. अशी सगळी गोंधळाची स्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. 

अखर्चित निधीसाठी डिसेंबरपर्यंत मुदत 
शासनाने मंजूर केलेला निधी अनेक पालिकांकडून वापरला गेलेला नाही, याची पाहाणी शासनाने केली आहे. त्यामुळे अखर्चित निधीबाबत कडक कारवाई करण्याचे पाऊल शासनाने उचलले आहे. त्यानुसार नगरविकास खात्याने प्रत्येक पालिकेस आदेश दिला आहे. पालिकांनी अखर्चित निधी डिसेंबरपर्यंत वापरावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

आदेशातील महत्त्वाचे... 
* पालिकांना मंजूर झालेला 2013-14 चा निधी त्वरित जमा करा 
* ज्या कामासाठी निधी वापरला, त्याच कामासाठी तो वापरावा 
* तीन वर्षांपूर्वीचा निधी डिसेंबरअखेर वापरण्याची सक्ती 
* निधी परत करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ 
* पालिकांनी जूनमध्ये दिलेल्या वर्कऑर्डरची कामे वगळणार

Web Title: Use the funds otherwise return