दुसऱ्या टप्प्यात 3 लाखांवर जणांना लस; ज्येष्ठ व विकारग्रस्तांना प्राधान्य

अजित झळके
Tuesday, 2 March 2021

सांगली महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठांच्या कोविड लसीकरणास आज प्रारंभ झाला.

सांगली : महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठांच्या कोविड लसीकरणास आज प्रारंभ झाला. महापालिका क्षेत्रात या टप्प्यात 73 हजार 557 लाभार्थी आहेत. याशिवाय विविध विकारांनी त्रस्त 32 हजार 358 जणांनाही प्राधान्याने लस दिली जाणार आहे.

जिल्ह्यात दोन लाख 15 हजार जणांना लस दिली जाणार आहे. अशा जिल्ह्यातील एकूण तीन लाखांवर लोकांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. केंद्र सरकारने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यात जिल्ह्यातील गावे आणि नगरपरिषदा हद्दीत ही मोहिम राबवली. एकूण 23 लाख 56 हजार 153 लोकसंख्येच्या तपासणीचे उद्दीष्ट होते. पहिल्या टप्प्यात 23 लाख 4 हजार 195 तर दुसऱ्या टप्प्यात 22 लाख 89 हजार 942 लोकांची तपासणी झाली. त्यातील ज्येष्ठ व विकारग्रस्तांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत लसीकरणाची सोय केली आहे. लसीकरणासाठी येताना ज्येष्ठ नागरिकांनी आपले ओळखपत्र सोबत आणावे आणि 45 ते 59 या वयोगटातील विकारग्रस्तांना वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत दिल्यानंतर लस दिली जाईल. सर्व हेल्थ पोस्टवर जागेवरच ऑनलाईन नोंदणी करून तात्काळ लसीकरण केले जाणार आहे. आज ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लसीकरणानंतर कोणलाही त्रास झाला नाही. 
दरम्यान आज पहिल्या दिवशी 393 जणांना लस देण्यात आली. जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना पहिल्या फेरीत लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या फेरीत सा वर्षे पूर्ण झालेले नागरीक, 45 वर्षे पूर्ण झालेले व्याधीग्रस्त यांना लस देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 2 मार्चपासून लसीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. या फेरीत पात्र असणाऱ्यांनी नोंदणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination of over 3 lakh people in the second phase; Preference to senior citizens and the disabled