
कोरोना विषाणू संसर्गासाठीची को-वॅक्सिन लस तयार असून उद्यापासून (ता. 27) या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी इस्लामपुरात सुरू होणार आहे.
इस्लामपूर (जि. सांगली) : कोरोना विषाणू संसर्गासाठीची को-वॅक्सिन लस तयार असून उद्यापासून (ता. 27) या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी इस्लामपुरात सुरू होणार आहे. पहिल्या दोन चाचण्या यशस्वी झाल्या असून, या लशीसाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळणारी प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट ही खासगी संस्थांमधील महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याची माहिती प्रकाश इन्स्टिट्यूटचे संस्थापक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. अभिमन्यू पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, ""हैदराबाद येथील भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. जागतिक पातळीवर विविध देशांनी लशी तयार केल्या असताना यात भारत देश आघाडीवर असला पाहिजे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न होता. त्याचेच हे यश आहे. दिल्ली येथील आयसीएमआर व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी- पुणे या संस्थांच्या मदतीने ही लस विकसित झाली आहे.
या लशीची तीन टप्प्यांत चाचणी होणार असून, पहिले दोन टप्पे यशस्वीपणे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 25,800 जणांना ही लस दिली जाणार आहे. 16 हजार जणांना लस दिली असून उर्वरित काम सुरू आहे. कोरोना प्रतिबंधासाठी उपयुक्त व सुरक्षित अशी ही लस असून तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. या टप्प्यात लसीकरणासाठी अत्युच्च दर्जाच्या संस्थांची निवड करण्यात आली असून, यात खासगी एकमेव प्रकाश मेडिकल कॉलेजची निवड झाली आहे. यामुळे राज्याच्या व शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.''
डॉ. पाटील म्हणाले, ""या लशीमधून निर्माण होणारी प्रतिजैविके पूर्ण कार्यरत होऊन परिणाम येण्यासाठी 42 दिवस लागतात. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागतो. भारत बायोटेकने एकूण एक हजार लशी आपणास मोफत दिल्या आहेत. नंतर गरजेनुसार त्या आणखी उपलब्ध केल्या जातील. चाचणीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मान्यता व परवानग्या मिळवल्या आहेत.''
अभिमन्यू पाटील म्हणाले, ""प्रत्येक लशीला विशिष्ट वातावरण लागते. आपणाला उपलब्ध असलेली लस सहा ते आठ अंश सेल्सिअस वातावरणात देखील वापरता येते. त्यामुळे तिची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होईल. ती आपल्या वातावरणात सहज देणे शक्य आहे. एक हजार जणांना सात दिवसांत ही लस देणार आहोत.''
निशिकांत पाटील म्हणाले, ""माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते रविवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता हे लसीकरण सुरू करत आहोत. एक माजी सैनिक, निवृत्त आर्मी अधिकारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व नर्सिंग स्टाफ यांना ही लस दिली जाईल.''
यावेळी वाळवा तालुका भाजपचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, प्रांजली बॅंकेचे अध्यक्ष संदीप सावंत, भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी नगरसेवक भास्कर कदम, भाजप युवा मोर्चाचे चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, वाहीद मुजावर उपस्थित होते.
संपादन : युवराज यादव