व्हॅलेंटाइन डे 2019 : हृदयातील धडधड... ‘सोशल’

Valentine-Day
Valentine-Day

सातारा - प्रेमाच्या व्याख्या, ते व्यक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी ती भावना आणि दोघांमधील प्रेम मात्र ‘सेम’च असते. उद्या (ता. १४) जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. पण, आता ‘व्हॅलेंटाइन डे’चे नुसतेच आकर्षण राहिलेले दिसून येत आहे. पूर्वीची हृदयातील धडधड...आजही तीच असली, तरी आज ही धडधड... व्हॉट्‌सॲपची टिंग...टिंग... बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

प्रेमाचा रंग वेगळाच असतो. प्रत्येकाला कुणाप्रती तरी प्रेम असतेच. हे प्रेम व्यक्‍त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. मग, ते प्रेम पती-पत्नीतील असेल, आई-मुलाचे असेल, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रिणीचे असेल किंवा अन्य कोणाचे. ‘व्हॅलेंटाइन डे’ची तरुणाईमध्ये अधिक आतुरता दिसून येते. १९९२ पर्यंत भारतात व्हॅलेंटाइन डे बद्दल फारशी माहिती नव्हती. मुळात ते भारतीयांपर्यंत पोचलेच नव्हते. त्यानंतर माध्यमांद्वारे हे लोकांपर्यंत पोचले आणि आज ‘व्ही-डे’ हे एक सेलिब्रेशनच बनले. 

प्रेम यापूर्वीही व्यक्‍त केले जात होते, आताही केले जाते. हृदयातील धडधड...आजही तीच असली, तरी ते प्रेम व्यक्‍त करण्याची पद्धत बदलली. पूर्वी एखाद्या मुलाने मुलीजवळ प्रेम व्यक्‍त केल्यानंतर बरेच दिवस होकाराची प्रतीक्षा लागून राहायची. मुलाने प्रेम व्यक्‍त केल्यानंतर मुलीच्या मनात एक आतुरता असायची. पण, आज ती आतुरता व्हॉट्‌सॲपने संपविली आहे. व्हॉट्‌सॲपमध्ये तरुणाई इतकी गुरफटली आहे, की ग्रीटिंग कार्ड डाउनलोड करून आपल्या प्रिय व्यक्‍तीस फॉरवर्ड करण्यात धन्यता मानत आहे. 

प्रेम व्यक्‍त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नाही, असे एकीकडे म्हटले जाते. पण, दुसरीकडे मात्र तरुणाई ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने पार्टी किंवा कोठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केले जाते. प्रेम व्यक्‍त करण्याकरिता किंवा होकार मिळण्याकरिता, देण्याकरिता तरी या दिवसाची प्रतीक्षा केली जात नाही. अर्थात तरुणाईमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’चे नुसतेच आकर्षण राहिले आहे.

कॉलेज, बाजारपेठा ‘यूथफुल’ 
फेसबुक वॉलपासून कॉलेजचे कट्टे, शॉप ते मॉल्सपर्यंत सगळीकडे व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर ‘यूथफुल’ वातावरण बनले आहे. केक, टेडी बेअर, ग्रीटिंग्ज, सॉफ्ट टॉइज, फॅन्सी घड्याळे, कपल्स चॉकलेट, रोझ चॉकलेट, सेंट अशा वस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट शॉपमध्ये तरुणाईची गर्दी होत आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटने व्हॅलेंटाइन कपलसाठी खास कॅण्डल लाइट डिनरच्या ऑफर्सही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com