वराडेतील चालुक्‍यकालीन शिलालेख उजेडात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

सातारा - महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा इसवीसन १०९१ मधील शिलालेख वराडे (ता. कऱ्हाड) येथे सापडला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन (इसवीसन ११४८) शिलालेख म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात आढळतो. त्यापूर्वी ५७ वर्षे जुना हा शिलालेख आहे. जिल्ह्यातील चालुक्‍य आणि कलचुरी घराण्यांच्या सत्तेचा इतिहास या निमित्ताने उजेडात आला आहे.

सातारा - महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा इसवीसन १०९१ मधील शिलालेख वराडे (ता. कऱ्हाड) येथे सापडला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वांत प्राचीन (इसवीसन ११४८) शिलालेख म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात आढळतो. त्यापूर्वी ५७ वर्षे जुना हा शिलालेख आहे. जिल्ह्यातील चालुक्‍य आणि कलचुरी घराण्यांच्या सत्तेचा इतिहास या निमित्ताने उजेडात आला आहे.

याबाबतची माहिती कला व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहासाचे प्रा. गौतम काटकर व मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या दोघांनीच या शिलालेखावरील माहिती उजेडात आणण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांनी सांगितले, ‘‘कऱ्हाड आणि परिसरावर ११ व्या शतकात कल्याणीच्या चालुक्‍यांची राजवट होती. त्या काळात कऱ्हाड चार हजार गावांचा मिळून बनलेला एक राजकीय विभाग होता. त्याचे मुख्य ठिकाण कऱ्हाड असल्याने चालुक्‍यांच्या राज्यातील ते एक प्रमुख शहर होते. चालुक्‍यांचे महामंडलेश्‍वर असणाऱ्या कलचुरी राजघराण्याची सत्ता या भागात होती. ते चालुक्‍यांच्या वतीने कऱ्हाड आणि परिसराचा कारभार पाहात. चालुक्‍यांच्या राजवटीत कऱ्हाड हे प्रमुख ठिकाण असूनही कऱ्हाड तालुक्‍यात एकही शिलालेख आजवर आढळून येत नव्हता. मात्र, वराडे येथे सापडलेल्या या शिलालेखामुळे ही उणीव भरून निघाली आहे.’’

महामार्गावर वराडे गावच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घटनेश्‍वर मंदिरालगत हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत होता. हा लेख दानलेख असून त्यावर ‘सवत्स धेनू’चे शिल्प आणि शिवलिंग व सूर्य, चंद्र कोरले आहेत. हा हळेकन्नड लिपित, २० ओळींत लेख आहे. शके १०१३ प्रजापती नाम सवंत्सरी म्हणजे इसवीसन १०९१ मध्ये हा दानलेख लिहून ठेवण्यात आला. जोगम कलचुरी याचा अधिकारी असणाऱ्या सगरैया याने वराडे परिसरातील एका शिवमंदिराला नैवेद्य नंदादीपासाठी दान दिल्याचा उल्लेख यात आहे. लेखात जोगम याचा उल्लेख चालुक्‍याचा मांडलिक असा न करता महामंडलेश्‍वर असा केला आहे. यावरून या काळात जोगम कलचुरी हा बराच प्रबळ झाला असून कऱ्हाड आणि परिसरात स्वतंत्र राज्य करीत असल्याचे अनुमान करता येते, असे प्रा. काटकर व श्री. कुमठेकर यांनी सांगितले. या शिलालेखाच्या वाचनासाठी प्रा. डॉ. व्ही. एस. माळी (हारूगेरी, जि. बेळगाव) यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रा. डॉ. एस. पी. शिंदे, प्रा. डॉ. आर. बी. सातपुते आदी उपस्थित होते.

या दुर्मिळ शिलालेखासंदर्भात आम्ही महाविद्यालयातर्फे पुरातत्त्व विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधणार आहे.
- प्राचार्य यशवंत पाटणे

Web Title: varde Inscription