वर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

अपशिंगेपाठोपाठ वर्णे व अंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनण्याचा बहुमान संपादन केला आहे. जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे.

अंगापूर : अपशिंगेपाठोपाठ वर्णे व अंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनण्याचा बहुमान संपादन केला आहे. जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे.

अपशिंगे (मिलिटरी), वर्णे त्याचबरोबर अंगापूर येथील शाळा क्रमांक एक या दहा किलोमीटर परिघातील शाळा आहेत. एकाच वेळी या तिन्ही शाळांनी संपादन केलेले हे यश कौतुकास्पद ठरणारे आहे. अलीकडच्या काळात अपशिंगे येथील शाळा प्रथम आंतरराष्ट्रीय बनली. त्यानंतर वर्णे व अंगापूर (शाळा क्रमांक एक) याही शाळा आंतरराष्ट्रीय शाळांच्या पंक्तीत जाऊन पोहोचल्या आहेत. काल याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय शाळांच्या निकषान्वये वर्णे व अंगापुरातील शाळांची पाहाणी करण्यात आली होती. त्यातील सर्व मानकांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी या दोन्ही शाळांनी केली. 

संबंधित गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्नही याकामी महत्वाचे ठरल्याचे धुमाळ यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय दर्जामुळे इथल्या शिक्षण पद्धतीत येत्या शैक्षणिक वर्षापासून आमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम बालवर्ग ते तिसरी इयत्तेपर्यंत शिकविला जाणार आहे. शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही उपलब्ध होणार आहेत. येत्या काळात तालुक्यातील कोडोली व लिंब येथील प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय शाळा बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"सातारा तालुक्यातील एकाच परिसरातील तीन प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय दर्जा संपादन केला आहे. ही शैक्षणिक कामगिरी कौतुकास्पद ठरावी."
- संजय धुमाळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सातारा

Web Title: Varna, Angpur International schools status