'वसंतदादांचे विचार राज्याला प्रगतिपथावर नेतील'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

"प्रतीक यांनी वारसा चालवावा'
अशोक चव्हाण म्हणाले, की वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी दादांचा वारसा सांभाळावा, तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळावे.''

श्री. चव्हाण यांनी हे विधान करून दादा, कदम घराण्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादाला तिलांजली द्यावी आणि एकत्र यावे, असाच संदेश वसंतदादा पाटील जन्मशताब्दीच्या व्यासपीठावरून दिला, अशी चर्चा सुरू होती.

सांगली : सहकारी चळवळ पूर्वीसारखी राहिली नाही. कारखाने मोडून सहकार कसा वाचणार? सहकारी चळवळ वाचवायची असेल, तर वसंतदादांच्या विचारांनी
काम करावे लागेल. त्यांचे विचार राज्याला प्रगतिपथावर नेल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी रविवारी (ता. 13) येथे केले.

शिवराज पाटील यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल, स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ रविवारी झाला.
कृष्णा नदीतीरावरील वसंत स्फूर्तिस्थळ या दादांच्या समाधीस्थळी रविवारी अभिवादनासाठी श्री. पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, शिवाजीराव देशमुख, आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.
या वेळी शिवराज पाटील म्हणाले, की केवळ शेती करून इतर देशांशी स्पर्धा करता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर वसंतदादा, बाळासाहेब विखे-पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांनी औद्योगिकरणाची चळवळ सुरू केली. त्याच वेळी सहकार चळवळही सुरू झाली; मात्र ही चळवळ पूर्वीसारखी राहिली नाही. साखर कारखाने, सूत गिरण्या उभ्या केल्या; पण त्या चालत नाहीत. या संस्था चांगल्या चालवणे ही दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. सहकार चळवळ मोडली, तर काळा पैसा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी ही चळवळ पुन्हा उभारावी लागेल. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, म्हणून त्यांनी मार्केट कमिट्यांची निर्मिती केली.''
वसंतदादा जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांची भाषणे झाली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माणिकराव ठाकरे यांनीही दादांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी श्रीमती शैलजा पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे यांनी स्वागत केले.

"प्रतीक यांनी वारसा चालवावा'
अशोक चव्हाण म्हणाले, की वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांनी दादांचा वारसा सांभाळावा, तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळावे.'' श्री. चव्हाण यांनी हे विधान करून दादा, कदम घराण्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादाला तिलांजली द्यावी आणि एकत्र यावे, असाच संदेश वसंतदादा पाटील जन्मशताब्दीच्या व्यासपीठावरून दिला, अशी चर्चा सुरू होती.

(सर्व छायाचित्रे- उल्हास देवळेकर, सांगली)

Web Title: vasant dada's thoughts will help progress

फोटो गॅलरी