अडतविरोधात भाजीपाल्याचे सौदे बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, या निर्णयाच्या विरोधात भाजी विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनात मार्ग न निघाल्याने उद्या (ता. २) पासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

दरम्यान, आज व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमधील भाजीपाला व फळांचे सौदे बंद पाडले. त्यामुळे साधारणपणे आठ ते दहा लाखांचा भाजीपाला मार्केटमध्ये पडून राहिल्याने व्यवहार ठप्प राहिले. आंदोलकांनी मार्केटमध्ये भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांची हवा सोडल्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते.

कोल्हापूर - शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, या निर्णयाच्या विरोधात भाजी विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनात मार्ग न निघाल्याने उद्या (ता. २) पासून शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. 

दरम्यान, आज व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमधील भाजीपाला व फळांचे सौदे बंद पाडले. त्यामुळे साधारणपणे आठ ते दहा लाखांचा भाजीपाला मार्केटमध्ये पडून राहिल्याने व्यवहार ठप्प राहिले. आंदोलकांनी मार्केटमध्ये भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांची हवा सोडल्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते.

शेतकऱ्यांकडून मार्केट यार्डमध्ये विक्रीस येणाऱ्या भाजीपाल्यावर शेतकऱ्यांकडून ६ टक्के अडत वसूल करण्यात येत होती. शासनाने शेतकऱ्यांवरील हा बोजा हटविला आणि तो व्यापाऱ्यांवर टाकला.

व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करण्यास सुरवात केली. सहा महिन्यांपूर्वी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांनी मोर्चाही काढला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती; पण जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज अचानक व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविला. 

व्यापारी दुपारी घोषणा देतच बाजार समितीमध्ये आले. ते येण्यापूर्वी भाजीपाल्याचा सौदा पूर्ण झाला होता. त्यामुळे केवळ फळभाज्यांचा सौदा राहिला होता. सौदे सुरू असतानाच व्यापाऱ्यांनी ते बंद पाडण्यास सुरवात केली. यावरून व्यापारी आणि अडते यांच्यात वाद झाला. त्यामुळे तेथून व्यापारी बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी घोषणा देण्यास सुरवात केली. 

याच दरम्यान, भाजी घेऊन येणाऱ्या वाहनांना व्यापाऱ्यांनी अडविण्यास सुरवात केली. काही वाहनांमधील हवा सोडली. त्यामुळे येथील वातावरण तणावाचे बनले. व्यापाऱ्यांची गर्दी पाहून त्यांना सभापती सर्जेराव पाटील यांनी चर्चेसाठी बाजार समितीच्या सभागृहात बोलविले. या वेळी अनेक संचालकांनी आंदोलनाची ही पद्धत योग्य नसल्याचे आंदोलकांना सुनावले.
 या वेळी बोलताना राजू जाधव म्हणाले, ‘‘भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांकडून ६ टक्‍के अडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला विरोध आहे. ही अडत रद्द करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे यातून सामंजस्याने मार्ग काढावा.’’

राजेंद्र लायकर म्हणाले, ‘‘व्यापाऱ्यांना अनेक प्रकारचे कर द्यावे लागतात. शिवाय महापालिकेचा ससेमिरा कायम मागे असतो. त्यामुळे व्यापाऱ्यांवरील सक्‍तीची वसुली थांबवावी. चुकीच्या धोरणामुळे बाजार समितीमधील बाजार बाहेर जाऊ लागला आहे. सरकारने व्यापाऱ्यांवर लादलेली अडत रद्द न केल्यास कर्जबाजारी असलेल्या व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. बाजार समिती मोडण्यासही वेळ लागणार नाही.’’

श्री. मेढे यांनीही व्यापाऱ्यांकडून अडत वसुली करू नये, असे मत मांडले.
जमीर बागवान म्हणाले, ‘‘अडत्यांचा काही दोष नसताना यामध्ये अडते भरडले जात आहेत. आज अचानक बंद पाडलेल्या सौद्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण?’’

भगवान काटे म्हणाले, ‘‘आजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली; पण शेतकऱ्यांचे नुकसान कधी होऊ दिले नाही. आंदोलनाचेही टप्पे असतात. अचानक उठायचे आणि आंदोलन करायचे, ही आंदोलनाची पद्धत नव्हे. व्यापारी ज्या निवेदनाबाबत सांगत आहेत त्यातही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आणि बाजार समितीला दिलेले निवेदन यातही फरक आहे. शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे. त्यामुळे आंदोलन करून शेतकऱ्यांना वेठीस जर कोणी धरणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.’’

नंदकुमार वळंजू यांनीही आंदोलकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘आपण व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीवर निवडून आलो आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे हित प्रथम मी पाहत असतो. तरीदेखील आज ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले ती पद्धत बरोबर नव्हती. जो माल पडून आहे, त्याच्या नुकसानीला कोण जबाबदार? व्यापाऱ्यांची मागणी मान्य करण्याचे अधिकार जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाहीत, बाजार समिती फार लांब राहिली. त्यामुळे दाद सरकारकडे मागितली पाहिजे. जर व्यापारी सौदे बंद पाडणार असतील तर आम्हालाही आमचा निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना माल आणण्यासंदर्भात आम्हाला त्यांच्याशी बोलले पाहिजे. तेव्हा सभापतींनी यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करावा.’’ 

विलास साठे यांनीही व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर शहर उपनिबंधक संभाजी निकम म्हणाले, ‘‘व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे त्यावर इथे निर्णय घेणे शक्‍य नाही. तेव्हा व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे व सौदे सुरू करावेत.’’

त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजू जाधव यांनी बैठकीत येऊन सांगितला. यावर पुन्हा नंदकुमार वळंजू, भगवान काटे, कृष्णात पाटील, विलास साठे यांनी व्यापारी सौद्याला येणार की नाही, असे विचारले. तसेच सौदे बंद ठेवणार की सुरू करणार, याचा खुलासा करण्याची मागणी केली. 

यावर श्री. जाधव यांनी आम्ही बाजार समितीच्या आवारात कोणतेही आंदोलन करणार नाही, सौद्यांमध्ये भाग घेणार नाही; मात्र शहरातील भाजी मंडई बंद ठेवणार, असे सांगितले.

शेवटी सभापती सर्जेराव पाटील यांनी, बाजार समितीमध्ये सौद्यांमध्ये अडथळे आणल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. याबाबत सहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा श्री. जाधव यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी व्यापाऱ्यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार उपनिबंधक, बाजार समिती यांना सूचना देणे आवश्‍यक होते. पण नेहमीप्रमाणे निवेदन घेतले आणि बाजूला ठेवले. याची महिती संबंधित यंत्रणेला न दिल्यामुळे सौदे बंद पाडण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: vegetable deals close