मलकापूर : भाजीमंडईचा प्रश्न अखेर मार्गी

राजेंद्र ननावरे
रविवार, 1 एप्रिल 2018

मलकापूरच्या भाजीमंडईचा चिघळलेल्या प्रश्नाबाबत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीला पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यास विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकिय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. 

मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : येथील भाजीमंडईचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला. खासगी जागेसह रोडवर मंडई बसवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकित घेण्यात आला. शनिवारपर्यंत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जागा आखून देण्यात येणार असून यापुढे जर मंडईच्या विषयावरून वाद झाल्यास कडक कारवाई करण्याचा सज्जड दम ही संघटनांना व राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आला.

मलकापूरच्या भाजीमंडईचा चिघळलेल्या प्रश्नाबाबत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीला पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यास विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकिय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रांताधिकारी खराडे म्हणाले, खासगी जागेत मंडई भरवताना नगरपंचायतीची रितसर परवानगी घ्यावी. शिवाय ज्या सुविधा गरजेच्या आहेत, त्या सुविधा देऊन मंडई भरवण्यास हरकत नाही. ज्यांना खासगी जागेत व्यवसाय करायचा आहे ते करू शकतात. नगरपंचायत मालकीच्या रोडवरही गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन विक्रेते बसण्यास हरकत नाही. त्यासाठी नगरपंचायतीने नियमाप्रमाणे त्यांना जागा आखून द्याव्यात. पहिले काही दिवस या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.  श्री. शिंदे म्हणाले, प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे दोन जागेवर नियोजनबद्ध मंडई भरवण्यास नगरपंचायत शनिवारपर्यंत प्रयत्न करेल. रस्त्यावर बसणाऱ्या मंडईस एका रांगेत जागा आखून दिली जाईल. पार्कींगचा विचार करून गाळेधारकांना त्रास होणार नाही यावर विचार केला जाईल. 

Web Title: vegetable market in malkapur