वाहनांच्या बोगस इन्शुरन्सला चाप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

परिवहन विभागाने इन्शुरन्स कंपन्यांना वाहनांच्या इन्शुरन्सची माहिती वाहन- ४ या प्रणालीवर भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये चालणारा बोगस इन्शुरन्सचा बाजार थांबणार आहे.

सातारा - परिवहन विभागाने इन्शुरन्स कंपन्यांना वाहनांच्या इन्शुरन्सची माहिती वाहन- ४ या प्रणालीवर भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये चालणारा बोगस इन्शुरन्सचा बाजार थांबणार आहे.

वाहनाची नोंदणी, ट्रान्स्फर, पासिंग या गोष्टी करताना सर्व कागदपत्रे पूर्ण असावी लागतात. त्यामध्ये इन्शुरन्सचाही समोवश होता. काही वाहन चालक गाडी घेताना काढलेल्या इन्शुरन्सनंतर पुन्हा काढण्याच्या फंदात पडत नाही; परंतु गाडी विकल्यानंतर ती दुसऱ्याच्या नावावर नोंद करताना इन्शुरन्स काढला जातो. तसेच दर वर्षी पासिंग आवश्‍यक असलेल्या वाहनांनाही दर वर्षी इन्शुरन्स काढावा लागतो. मात्र, हे पैसे वाचविण्यासाठी बोगस इन्शुरन्सचा पर्याय काही ठिकाणी वाहनचालकाला उपलब्ध करून दिला जात होता. बनावट कागदपत्रे तयार करून वाहनाच्या कागदपत्राला जोडली जात होती आणि त्या बोगस कागदपत्रांच्या आधारेच वाहनांची नोंद, पासिंग होत होते. त्यातून अनेकांनी खूप माया जमवली. त्याचे कारण होते, इन्शुरन्स खरा की खोटा आहे ही पाहण्याच सोपी पद्धत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नव्हती.

इन्शुरन्स खरा आहे की खोटा हे पाहण्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सुविधा उपलब्ध होती; परंतु दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी नोंदणी व पासिंगचे काम पाहता इन्शुरन्स तपासण्याच्या भानगडीत उपप्रादेशिक परिवहन विभाग पडत नव्हता. कागदाला कागद असला की बास, काही झालेच तर, वाहन मालक जबाबदार असणार होता. तपासणीच्या भानगडीत कोणी पडत नव्हते. त्यामुळे हा बाजार बोकळला होता. सर्व काही माहीत असूनही परिवहन विभाग काही करू शकत नव्हता; परंतु परिवहन विभागाने वाहनांच्या सर्व माहिती व कामकाजासाठी वाहन - ४ ही प्रणाली स्वीकारली आहे. ही सिस्टिम पूर्णत: ऑनलाइन आहे. त्याचा उपयोग करत परिवहन विभागाने बोगस इन्शुरन्सचा बीमोड करण्यासाठी नवा फंडा शोधला आहे. पूर्वी वाहनाच्या इन्शुरन्स वाहन प्रणालीवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंद केली जायची. आता ही पद्धत बदलून परिवहन विभागाने इन्शुरन्स कंपन्यांना वाहन-४ ची लिंक उपलब्ध करून दिली आहे. वाहनाचा इन्शुरन्स करत असतानाच त्याची नोंद इन्शुरन्स कंपन्यांनीच वाहन- ४ या प्रणालीवर करायची आहे. त्यामुळे इन्शुरन्सची सर्व माहिती आपोआप शासकीय यंत्रणेवर उपलब्ध होत आहे. परिवहन विभागाच्या साईटवर वाहनधारकालाही ती पाहण्यास उपलब्ध होत आहे.

Web Title: Vehicle Bogus Insurance RTO