वाहन चोऱ्यांवर रामबाण उपाय!

प्रवीण जाधव
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सातारा - वाहन चोरी रोखण्यासाठी परिवहन विभागाने आश्‍वासक पाऊल उचलले असून, त्यानुसार एक एप्रिलपासून सर्व वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीपासून नव्या वाहनांना या नंबरप्लेट डिलरकडून मिळणार आहेत तर, जुन्या वाहनांना त्या बसवाव्या लागणार आहेत.

सातारा - वाहन चोरी रोखण्यासाठी परिवहन विभागाने आश्‍वासक पाऊल उचलले असून, त्यानुसार एक एप्रिलपासून सर्व वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीपासून नव्या वाहनांना या नंबरप्लेट डिलरकडून मिळणार आहेत तर, जुन्या वाहनांना त्या बसवाव्या लागणार आहेत.

राज्याबरोबरच देशात वाहन चोरीचे मोठे प्रमाण आहे. कोणत्याही वाहनाची चोरी झाल्यावर चोरणारे पहिल्यांदा त्या वाहनांची नंबरप्लेट काढतात. सध्या नंबरप्लेट बनविण्याच्या व बसविण्याच्या पद्धतीमुळे कोणालाही कोणत्याही क्रमांकाची नंबरप्लेट तयार करणे अत्यंत सोपे आहे. तशा विविध नंबरच्या प्लेट वाहन चोरट्यांकडे उपलब्ध असतात. त्यामुळे गाडी चोरल्यानंतर तिला असणारी नंबरप्लेट काही अंतर गेल्यावर काढून ती टाकली जाते. त्याजागी दुसरी बनावट नंबरप्लेट बसविली जाती. या प्रकारामुळे गाडी चोरीची असू शकते, अशी शंका पोलिस किंवा नागरिकांना येत नाही. अशाच चोरलेल्या वाहनांतून अनेक गंभीर प्रकारे गुन्हे झाल्याचेही अनेकदा समोर आले आहे. अगदी देश विघातक कृत्यांमध्येही बनावट नंबरप्लेटची वाहने वापरली गेली आहेत. 

त्याचबरोबर सध्या वाहनांची नंबरप्लेट कशा प्रकारची असावी, याबाबत काही नियम आहेत. परंतु, तयार करणाऱ्यांकडून या नियमांची पूर्णतः अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे चित्रविचित्र अशा नंबरप्लेट आपल्याला रस्त्यावर दिसत असतात. बाबा, दादा, नाना, काका अशा विविध नावांच्या नंबरप्लेटही दिसत असतात. या वाहनांकडून एखादा अपघात झाला किंवा त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर अशा विचित्र नंबरप्लेटमुळे वाहनाची नेमकी माहिती पोलिस व नागरिकांना दिसत नाही. त्यामुळे अशी वाहने शोधणे अडचणीचे ठरत असते.

नंबरप्लेटमुळे उत्पन्न होणाऱ्या या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेटचा पयार्य काढला आहे. काही राज्यांमध्ये याची पूर्वीच अंमलबजावणी झालेली आहे. महाराष्ट्रात एक एप्रिल २०१९ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. ही नंबरप्लेट कुठेही तयार करून मिळणार नाही. शासनाकडून अधिकृत केलेल्या डिलर्सना त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जागा दिली जाणार आहे. त्यांनाच नंबरप्लेट बनविण्याचा अधिकार असणार आहे. सध्याच्या नवीन नियमानुसार आता रजिस्ट्रेशन झाल्यावर वाहन ताब्यात मिळते. आता नवीन वाहनांच्या नंबरप्लेटही डिलरकडून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या वाहनांना अधिकृत डिलरकडून हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट तयार करून घ्यावी लागणार आहे. गाडीची सर्व माहिती विशिष्ट पद्धतीने या नंबरप्लेटच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच वाहनाला लावलेली ही नंबरप्लेट सहजासहजी काढता येणार नाही, अशा पद्धतीने बसविली जाणार आहे. काहीही करून ती काढली तर, ती पुन्हा वापरता येणार नाही, अशा पद्धतीच्या या नंबरप्लेट असणार आहेत. त्यामुळे गाडी चोरल्यानंतर तशा पद्धतीची दुसरी नंबरप्लेट चोरट्यांना उपलब्ध करता येणार नाही. त्यामुळे वाहन चोरीवर अंकुश येण्याबरोबर अपघात किंवा अन्य वेळी वाहनाचा नंबर समजण्यास मदत होणार आहे.

...अशी असेल हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट
नंबरप्लेट अल्युमिनियमपासून बनविलेल्या असणार आहेत. त्यावर अशोक चक्राच्या आकाराचा क्रोमियम होलोग्राम, युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांकही असणार आहे. आयएनडी ही अक्षरे तसेच सर्वत्र एकाच आकाराचा आणि डिझाईनचा वाहन क्रमांक या नंबरप्लेटवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नंबरप्लेटमध्ये देशभरात सुसूत्रता दिसणार आहे. 

Web Title: Vehicle Theft Crime Solution RTO