‘सुटा’तर्फे कुलगुरू देवानंद शिंदे हटाओ मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

माझ्यावर होणारे आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. विद्यापीठ आणि माझी बदनामी करणे हाच यामागचा हेतू आहे. शिवाजी विद्यापीठाचा कारभार पारदर्शक आणि नियमानुसारच सुरू आहे. विद्यापीठात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व आरोप खोटे आहेत.
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर - पदवी प्रमाणपत्रावर एकच सही असावी, असे तोंडी आदेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीच बैठकीत दिले होते. त्यांच्या सांगण्यावरूनच पदवी प्रमाणपत्राची दुबार छपाई झाली. चौकशी समितीचा अहवालही शिंदे यांनी नियमांकडे बोट दाखवून जाहीर केलेला नाही. कुलगुरू शिंदे यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीर कारभार केल्याचा आरोप सुटा संघटनेचे सहकार्यवाह डॉ. सुभाष जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला. कुलगुरू हटाओ मोहीम ‘सुटा’तर्फे सुरू करण्यात आली असून, मंगळवारी (ता. १६) शिवाजी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माझ्यावर होणारे आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. विद्यापीठ आणि माझी बदनामी करणे हाच यामागचा हेतू आहे. शिवाजी विद्यापीठाचा कारभार पारदर्शक आणि नियमानुसारच सुरू आहे. विद्यापीठात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्व आरोप खोटे आहेत.
- डॉ. देवानंद शिंदे,
कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

जाधव म्हणाले, की पदवी प्रमाणपत्र छपाईच्या आधी १३ मार्च २०१८ ला बैठक झाली. त्याचे मिनिट संघटनेला मिळाले आहेत. त्याची पाहणी केली असता कुलगुरू शिंदे यांनी मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर येथेही पदवी प्रमाणपत्रावर कुलगुरूंची एकच सही असावी, असे तोंडी आदेश दिले. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या एका पदवी प्रमाणपत्राची छायांिकत प्रतही सादर केली होती. हे करताना डॉ. शिंदे यांनी परिनियमातील तरतुदींची माहिती घेतली नव्हती.

त्यामुळे एका सहीची पदवी प्रमाणपत्रे छापली गेली. जेव्हा निर्णय योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी कुलसचिव आणि कुलगुरू दोघांच्याही सहीची पदवी प्रमाणपत्रे दुबार छापण्याचा निर्णय घेतला. चौकशी समितीच्या अहवालात हे सत्य लपविल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळेच हा अहवाल प्रसिद्ध केला जात नाही. व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनाही हा अहवाल दाखविला नसून, गोपनीयतेच्या नावाखाली तो दाबून ठेवला आहे. देवानंद शिंदे यांचा कारभार हा बेकायदेशीर आणि नियमबाह्य आहे. त्यांच्या काळात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला आहे. 

या वेळी अरुण पाटील, डी. एन. पाटील, सुधाकर मानकर उपस्थित होते. 

Web Title: Vice Chancellor Devanand Shinde Remove campaign by SUTA