व्हिडिओ गेम सेंटर चालकाचा आर्थिक व्यवहारातून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant navale

व्हिडिओ गेम सेंटर चालकाचा आर्थिक व्यवहारातून खून

कुपवाड - आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून कुपवाड बामणोली रस्त्यावरील गेम सेंटरमध्ये धारदार चाकू हल्ल्यात एकाचा खून झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रशांत महादेव नवाळे (वय ४८, रा. कापसे प्लॉट) असे मृताचे नाव आहे. या खूनप्रकरणी चाँद मिरासो शेख (वय २९, रा. कापसे प्लॉट) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकरणातील मृत नवाळे हे कुपवाड बामणोली रस्त्यावरील एका गाळ्यात व्हिडिओ गेम सेंटर चालवतात. संशयित हल्लेखोर चाँद आणि नवाळे दोघेही कुपवाडच्या कापसे प्लॉट परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्यामध्ये दीड वर्षांपूर्वी आर्थिक व्यवहार झाला होता. यावरून दोघांत धुसफूस होती. काल बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान नवाळे हे आपल्या सहकाऱ्यासह गेम सेंटरमध्ये बसले असताना संशयित चाँद हा हत्यार सोबत घेऊन आला. आर्थिक देवाण-घेवाणीवरून दोघांत बाचाबाची सुरू झाली. दीर्घकाळ सुरू असणाऱ्या बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले. याचवेळी चाँद याने रागाच्या भरात कंबरेला लटकवलेल्या धारदार चाकूने नवाळे यांच्यावर हल्ला चढवला. यात छातीवर वर्मी घाव बसल्याने नवाळे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याची घाबरगुंडी उडाली. संशयित चाँदने घटनास्थळाहून पळ काढला. प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेनंतर तातडीने सूत्रे हाताळत कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी शोधपथके रवाना केली. संशयित चाँद यास काही वेळातच ताब्यात घेण्यात आले. मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. संशयिताविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.