Vidhan Sabha 2019 : आवाडे गट लढविणार 'या' जागा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

इचलकरंजी - काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्‍यात सुध्दा ताकद असल्याने या दोन्ही मतदारसंघात आवाडे गटाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील राजकीय घडोमोडीबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

इचलकरंजी - काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्‍यात सुध्दा ताकद असल्याने या दोन्ही मतदारसंघात आवाडे गटाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील राजकीय घडोमोडीबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघातही आवाडे गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यादृष्टीने बांधणीही सुरु झाली आहे.

पक्षीय बंधनातून मुक्त झाल्यानंतर आवाडे गटाची पुढील दिशा संदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी येथील उत्तम चित्रमंदिरातील जनसंपर्क कार्यालयात हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील आवाडे समर्थकांची बैठक झाली. पूर्वी इचलकरंजीत मतदारसंघात समाविष्ट 13 गावांमध्ये आवाडे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.

आता या गावांचा समावेश हातकणंगले मतदारसंघात झाला आहे. त्याचबरोबर शिरोळ तालुक्‍यातही आवाडे गटाची मोठी ताकद असल्याने या दोन्ही मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार आहेत. त्यातूनच हातकणंगले आणि शिरोळ विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी घडलेल्या घटनांचा आढावा घेत उद्‌भवलेल्या परिस्थितीनुरुप हा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगितले.

ते म्हणाले, "" ज्यांना साथ द्यावयाची आहे त्यांनी प्रामाणिकपणे साथ द्यावी, ज्यांना अडचण वाटत असेल त्यांनी स्पष्टपणे सांगावे. तुम्हा सर्वाच्या पाठबळावरच वाटचाल सुरु आहे. त्याचबरोबर प्रसंगानुरुप निर्णय घेण्यासाठी सर्वानी मला अधिकार द्यावा. पण जो अंतिम निर्णय घेतला जाईल तो सर्वासोबत चर्चा करुन घेतला जाईल.''

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, मतदारसंघाचा खुंटलेला विकास, वस्त्रोद्योगाची होत असलेली वाताहात आणि सक्रीय लोकप्रतिनिधीची कमतरता याचा विचार करुन परिस्थितीनुसार पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. म्हणूनच आता वस्त्रनगरीला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन द्यावयाचे असेल तर प्रकाश आवाडे यांच्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी असणे तितकेच गरजेचे आहे. सर्वंकष गोष्टींचा विचार करुन प्रकाश आवाडे यांना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी बाबासाहेब चौगुले, किरण कांबळे, नुरमहंमद मुजावर, पुंडलिक वाईंगडे, जे. जे. पाटील, प्रकाश पाटील, अभय काश्‍मिरे, आदगोंडा पाटील, सनतकुमार भोज, विजय कुंभोजे, जिन्नाकाका पाटील, श्रीकांत गतारे, प्रकाश चौगुले, दिलीप हेरलगे, रावसाहेब मुरचिट्‌टे, तात्यासाहेब अथणे, भरतेश चौगुले, बबन मुरगुंडे, विजय उगारे, उत्तम सुर्यवंशी, बबन बगसार, मनोज पाटील अमेय जाधव, सुरज बेडगे, अविनाश पाटील, अनिल पाटील, दादा सांगावे, सुरेश मगदूम, अतुल चौगुले, सुभाष ससे, एन. डी. पाटील आदींसह दोन्ही तालुक्‍यातील प्रमुख उपस्थित होते. सुभाष गोटखिंडे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Awade group will contest these seats