Vidhan Sabha 2019 : सांगली जिल्ह्यात भाजपच्या चाैघांचा बंडाचा झेंडा 

Vidhan Sabha 2019 : सांगली जिल्ह्यात भाजपच्या चाैघांचा बंडाचा झेंडा 

सांगली -  भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करून अपयश आल्यानंतर चौघांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. इस्लामपुरातून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काल अर्ज भरला. त्यापाठोपाठ आज शिराळा मतदार संघातून सम्राट महाडिक, सांगलीतून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे आणि जत मतदार संघातून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपला आव्हान दिले. 

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर बलाढ्य झालेल्या भाजपमध्ये यावेळी आठ जागांसाठी 31 जणांनी मुलाखती दिल्या होत्या. जतमध्ये तर पाच मातब्बर इच्छुक होते. अशावेळी पक्षात बंडाचे वादळ घोंघावणार, असे स्पष्ट चित्र दिसत होते. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी त्यापैकी चारजणांनी आपली नौका प्रवाहात घातली आहे. शिडात हवा भरण्याचे काम सुरु झाले आहेत. आता भाजपमध्ये त्यांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. विशेषतः शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांची बंडखोरी भाजप उमेदवार आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे महाडिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु करण्यात आले आहेत. 

जत तालुक्‍यात आमदार जगताप यांच्या विरोधात पाचपैकी कुणा एकाला उमेदवारी द्या म्हणणाऱ्या गटाने डॉ. आरळी यांच्या गळ्यात बंडाची माळ घातली आहे. ते जुने भाजप कार्यकर्ते आहेत. त्यामुळे माघारीसाठी त्यांच्या संपर्कात जुने भाजपचे नेते आहेत. जतमध्ये भाजपची बंडखोरी मोठे आव्हान ठरू शकते. तीच स्थिती सांगलीत दिसू लागली आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात होते, असे सांगण्यात आले होते. वास्तविक, त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत भाजपलाच आव्हान दिले आहे. त्यांचा मतदार संघातील ग्रामीण भागातील प्रभाव चांगला आहे. या बंडखोरीला भाजप थोपवणार की पुढे चाल देणार, याकडे मात्र विशेष लक्ष असणार आहे. 

दरम्यान, पलूस - कडेगाव मतदार संघात मोठी घडामोड झाली असून जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप नेते संग्रामसिंह देशमुख यांनी निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे सांगलीचे नेते शेखर माने यांनीही अर्ज दाखल करत बंडाचा पवित्रा घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com