Vidhan Sabha 2019 : राधानगरीतील राष्ट्रवादीचा तिढा सुटला

Vidhan Sabha 2019 : राधानगरीतील राष्ट्रवादीचा तिढा सुटला

कोल्हापूर - विधानसभेच्या राधानगरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा सुटला असून, या मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे समजते.

पक्षाध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (ता. ४) कोल्हापुरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत बिद्री येथे राष्ट्रवादीचा मेळावा होत आहे. मेळाव्यात श्री. पवार यांच्याकडून के. पी. व ए. वाय. या मेहुण्या-पाहुण्यांचे मनोमिलन होणार आहे.

राष्ट्रवादीकडून माजी आमदार के. पी. पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या दोघांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. कोणत्याही स्थितीत उमेदवारी मलाच मिळायला हवी, अशी ए. वाय. यांची भूमिका आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये जाऊन श्री. पवार यांची भेट घेतली होती. मध्यंतरी अचानक दौऱ्यावर आलेल्या श्री. पवार यांनीही दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन हा वाद सोडवण्याची जबाबदारी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली होती. तथापि, श्री. मुश्रीफ यांनाही यात यश आले नव्हते.

आज ए. वाय. यांनी राष्ट्रवादीतील आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला; पण त्यात कोणताही निर्णय जाहीर केला नाही. पक्षाच्या निर्णयानंतर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे के. पी. यांची उमेदवारीच पक्षाध्यक्ष श्री. पवार यांनी निश्‍चित केली आहे. के. पी. यांना उमेदवारी दिली, तर माझ्यासाठी थेट श्री. पवार यांनीच काही तरी ‘शब्द’ द्यावा, अशी अटकळ ए. वाय. यांची आहे. त्यामुळेच त्यांनी आपला निर्णय दोन दिवस लांबणीवर टाकला. 
या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीतच के. पी. यांचा अर्ज भरण्याचे नियोजन आहे. 

बिद्रीतील मेळाव्याकडे लक्ष
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा बिद्री येथे होणार असून, मेळाव्यात के.पी. - ए.वाय. यांचे मनोमिलन श्री. पवार करणार आहेत. त्यामुळे श्री. पवार यांच्या या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com