Vidhan Sabha 2019 : शेकापतर्फे कोल्हापूर उत्तर, शाहूवाडीत उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, पाटील, लाड यांचे अर्ज गुरुवारी भरण्यात येणार आहेत.    

शेकाप कोल्हापुरात १९५२ पासून काम करीत आहे. या पक्षातर्फे यापूर्वी त्र्यं. सी. कारखानीस, डॉ. एन. डी. पाटील यांनी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. महापालिकेतही पक्षाची दीर्घकाळ सत्ता होती. पक्षाने जनोपयोगी सुधारणा केल्या, याशिवाय पक्षाने टोलविरोधी भूमिका घेतली आहे. महागाईविरोधात आवाज उठवत आंदोलनांद्वारे जनतेच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍नांवर सरकारला जाब विचारला. 

श्री. पवार-पाटील म्हणाले, की काही वर्षांत पक्षाने काढलेल्या मोर्चे आंदोलनातून पक्षकार्य चालविले आहे. अशा स्थितीत पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्याबरोबर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या क्षमता असलेले उमेदवार देत आहोत. या वेळी बाबूराव कदम, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, कुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, संग्राम माने, निवास लाड, मोहन पाटील आदी उपस्थित होते.  

लाड, पाटील जुने कार्यकर्ते
कोल्हापूर उत्तरमधून एन. डी. तथा बापू लाड यांना उमेदवारी दिली आहे. श्री. लाड शेकापचे जुने कार्यकर्ते आहेत. माजी खजानिस म्हणूनही त्यांनी काम पाहिले; तर पन्हाळा-शाहूवाडीत भारत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शेकापचे जुने कार्यकर्ते व पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य असलेल्या पाटील यांनी तालुक्‍याच्या राजकीय व सामाजिक चळवळीत ठसा उमटवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Lad, Bharat Patil contestant from Kolhapur North and Shahuwadi