Vidhan Sabha 2019 : उमेदवारी अर्जानंतर आमदार मुश्रीफ यांची भावनिक साद

Vidhan Sabha 2019 : उमेदवारी अर्जानंतर आमदार मुश्रीफ यांची भावनिक साद

कागल - उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या लोकगंगेच्या या महापुरापुढे मी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत घालीत आहे, असे भावनिक साद आमदार हसन मुश्रीफ यांनी अलोट गर्दीला घातली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, अलोट गर्दीत मिरवणूक निघाली. त्यानंतर झालेल्या सभेत आमदार मुश्रीफ बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार पी. एन. पाटील, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, सभापती राजश्री माने, सायराबी मुश्रीफ, भैय्या माने उपस्थित होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ऋण या जन्मीच काय, सात जन्मीही मी फेडू शकत नाही, असे मताधिक्‍य द्या की विरोधकांची छाती धडकेल. सध्याच्या सरकारने शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले नाही. धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. गड-किल्ल्यावर परमिट रूम व बारला परवानगी दिली. यंदाचा दसरा दिवाळी सण परिवर्तनाचा ठरावा. राज्यात आघाडीची सत्ता येणार आहे. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पेन्शन दोन हजार रुपये करू व देशात कागल एक नंबर करू.'' 

पी. एन. पाटील म्हणाले, ""आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या रुग्णसेवेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आमदार मुश्रीफ पुन्हा विजयी होणार आहेत. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. सध्याच्या सरकारने लोकांची फसवणूक केली आहे.'' 

भैया माने, विश्वास देशमूख, बी.जी. भास्कर, सागर कोंडेकर, दत्ताजीराव देसाई, किसनराव कुराडे, शिवाजीराव खोत यांची भाषणे झाले. 

दरम्यान आज सकाळी सहा वाजता आमदार हसन मुश्रीफ यांनी ग्रामदैवत गहिनीनाथांचे दर्शन घेऊन तिथेच उमेदवारी अर्जावर सह्या केल्या. त्यानंतर राम मंदिर, हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर, साई मंदिर, लक्ष्मी मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेतले. आमदार हसन मुश्रीफ यांचे मतदान नोंद असलेले लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर व त्यानंतर अप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथील हालसिद्धनाथाचे दर्शन घेतले. 

देवदर्शनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ साडेदहा वाजता कागल तहसील कार्यालयात पोहोचले. साडेअकरा वाजता श्री. मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या समवेत किसनराव कुराडे, प्रवीणसिंह पाटील, वसंतराव धुरे, किरण कदम हे प्रमुख उपस्थित होते. 

शिवरायांना अभिवादन 
अर्ज भरल्यानंतर आमदार मुश्रीफ हे मान्यवरांसह बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आले आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पार्टी गवईगट यांच्या झेंड्यांनी आणि बॅनरनी सजवलेल्या बैलगाडीत आमदार हसन मुश्रीफ चढले. त्यांनी स्वतः गाडी हाकली आणि मिरवणूक सुरु झाली. मिरवणूकीत महिला आणि वृद्ध महिलांचाही सहभाग लक्षवेधी होता. शिवाजी पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक निपाणी वेस येथे सभास्थानी आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com