Vidhan Sabha 2019 : धो-धो पावसाच्या साक्षीनं पवार म्हणाले, ‘होय मी चुकलो’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

सातारा : बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या 80 वर्षांच्या तरुणाला आज धो- धो कोसळणारा पाऊसही रोखू शकला नाही. खुर्च्यांच्या छत्र्या करून आपल्या लाडक्‍या नेत्याला ऐकण्यासाठी आतुरतने जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला हा नेता अंगावर पाऊस झेलत म्हणाला, "तुमचा निकाल सबंध महाराष्ट्राला सांगणार आहे, की सातारा जिल्हा शब्दांचा पक्का, चुकीच्या गोष्टींचे निर्दलन करणारा व छत्रपतींचा विचार खऱ्या अर्थाने जतन करणारा आहे, तुम्ही तो कराल अशीच मला अपेक्षा आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या आवाहनाला जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

सातारा : बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या 80 वर्षांच्या तरुणाला आज धो- धो कोसळणारा पाऊसही रोखू शकला नाही. खुर्च्यांच्या छत्र्या करून आपल्या लाडक्‍या नेत्याला ऐकण्यासाठी आतुरतने जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला हा नेता अंगावर पाऊस झेलत म्हणाला, "तुमचा निकाल सबंध महाराष्ट्राला सांगणार आहे, की सातारा जिल्हा शब्दांचा पक्का, चुकीच्या गोष्टींचे निर्दलन करणारा व छत्रपतींचा विचार खऱ्या अर्थाने जतन करणारा आहे, तुम्ही तो कराल अशीच मला अपेक्षा आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या आवाहनाला जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

धो-धो पावसात शरद पवारांचे घणाघाती भाषण

होय मी चुकलो
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि विधानसभेच्या उमेदवारांसाठी श्री. पवार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हा परिषद मैदानावर सभा झाली. भर पावसात श्री. पवार यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांचा समुदाय मैदानात उपस्थित होता. कोसळणाऱ्या पावसातच श्री. पवार यांनी आपले भाषण केले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात "उदयनराजे नकोत,' असे दहा वर्षे सांगत होतो, असा मुद्दा उपस्थित केला होता. तो धागा पकडून श्री. पवार म्हणाले, ""वरूण राजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. माणसाने आपली चूक झाली तर तरी, कबूल करायची असते. ती चूक आज मी कबूल करतो. त्यांना उमेदवारी देण्याची माझ्या हातून चूक झाली. ती चूक दुरुस्त करण्यासाठी या जिल्ह्यातील घराघरांतील तरुण व वडीलधारी 21 ऑक्‍टोबरची वाट पाहात आहेत. 21 तारखेला आपल्या मनातील निर्णय घेऊन हा जिल्हा श्रीनिवास पाटलांना निवडून देईल. पंतप्रधान साताऱ्यासह अन्य ठिकाणी येऊन गेले. मुख्यमंत्री म्हणताहेत, आमच्याकडे पैलवान आहेत; परंतु समोर पैलवान नाहीत. मला त्यांना सांगायचे आहे, की अनेक उत्तम पैलवान तयार करण्याचे काम या जिल्ह्यातील आमच्या सहकाऱ्यांनी केले आहे. कुस्ती व पैलवान हा भाजपला शोभणारा विषय नाही. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने कुस्ती-बिस्ती काही नाही. येत्या 21 तारखेचा तुमचा निकाल संबंध महाराष्ट्राला सांगणार आहे. सातारा जिल्हा हा शब्दांचा पक्का आहे. चुकीच्या गोष्टीचे निर्दालन करणारा, तसेच छत्रपतींचा विचार खऱ्या अर्थाने जतन करणारा आहे. तो इतिहास आपल्याला उद्या करायचा आहे. तुम्ही तो कराल अशी माझी अपेक्षा आहे.''

म्हणून पवारांना म्हणतात, 'जाणता राजा'

छत्री सारली दूर
पवारांची आजची सभा अभूतपूर्व अशीच होती. पाच वाजल्यापासून जिल्ह्यातील विविध भागांतील लोक शरद पवार यांना ऐकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मैदानावर जमा होत होते. साडेसहापर्यंत संपूर्ण मैदान खचाखच भरून गेले होते. ज्येष्ठांबरोबर युवकांची संख्याही मोठी होती. मैदानाबाहेरही लोकांची गर्दी होती. सुरवातीपासूनच संथपणे पाऊस सुरू होता, तरीही कार्यकर्त्यांनी मैदान सोडले नाही. पाऊस वाढेल तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. पावणेआठच्या सुमारास श्री. पवार व्यासपीठावर आले. व्यासपीठावर येताना त्यांच्या डोक्‍यावर छत्री धरलेली होती; परंतु समोर कार्यकर्त्यांना पावसात उभे असलेले पाहून शरद पवारांनी छत्री सोडून सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन केले.

...आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला
श्री. पवार यांच्याआधी रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाषण झाले. लगेच शरद पवार उभे राहिले. पावसाचा जोर नेमका त्या वेळी वाढला. धो-धो कोसळणारा पाऊस अंगावर घेत 80 वर्षांचा हा नेता कार्यकर्त्यांना संबोधित करत होता. पावसालाही अंगावर घ्यायला न डगमगणाऱ्या आपल्या नेत्याला पाहून कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढला होता. प्रत्येकाच्या भावना उचंबळून आल्या होत्या. सर्व जण शरद पवार या नावाचा जयघोष करत होते. निष्ठा आणि नेत्याविषयीच्या भावना यांनी संपूर्ण जिल्हा परिषद मैदान उत्साहाने उचंबळून आले होते. या जयघोषातच सातारा हा आपला बालेकिल्ला आहे आणि तो तुम्ही राखलाच पाहिजे, त्यासाठी सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी घरा-घरातल्या प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडावे, असे आवाहान त्यांनी केले. प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यांत अनोखी चमक घेतच भरपावसात मैदानाबाहेर पडताना दिसत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp leader sharad pawar historical speech at satara