Vidhan Sabha 2019 : बंडामुळे शिराळा, जत भाजपसाठी युद्धभूमी

अजित झळके
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस बाकी असताना शिराळा आणि जत हे दोन मतदारसंघ भाजपसाठी आता युद्धभूमी झाले आहेत. येथे पुढील आठ दिवसांत मोठी ताकद लावण्याची तयारी प्रदेश आणि जिल्हा पातळीवरून करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये बंड झाले असून, त्यामुळे मोठे आव्हान निर्माण करण्यात विरोधकांना यश आले आहे.

सांगली - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस बाकी असताना शिराळा आणि जत हे दोन मतदारसंघ भाजपसाठी आता युद्धभूमी झाले आहेत. येथे पुढील आठ दिवसांत मोठी ताकद लावण्याची तयारी प्रदेश आणि जिल्हा पातळीवरून करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये बंड झाले असून, त्यामुळे मोठे आव्हान निर्माण करण्यात विरोधकांना यश आले आहे. मात्र, भाजपनेही येथे विशेष लक्ष देत विरोधकांना तोडीस तोड यंत्रणा उतरवली आहे.

शिराळा मतदारसंघात नाईक अधिक देशमुख बरोबर विजय असे समीकरण जमेल, असा भाजपला विश्‍वास होता. त्यासाठी काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना भाजपमध्ये खेचून आणण्यात आले. त्यानंतरही इथला तिढा सुटलेला नाही. प्रचार मध्यावर आला आहे. राष्ट्रवादीच्या मानसिंग नाईक यांनी शिवाजीरावांवर भात्यातील विशेष अस्त्र काढून हल्ला चढवला आहे. आर्थिक अडचणी, ऊस बिलांच्या मुद्यावर त्यांची कोंडी करण्यात आली आहे. दुसरीकडे सम्राट महाडिक यांनी मोठी ताकद लावून बंड यशस्वी करण्याचा प्रयत्न चालवला असल्याने वाळवा मतदारसंघातून जयंत पाटील विरोधकांच्या मतांचे धुव्रीकरण भाजपसाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात तळ ठोकून दुरुस्त्या करा, असे आदेश प्रदेश पातळीवरून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवस येथे मोठ्या घडामोडी घडणार हे नक्की आहे.  

जत विधानसभा मतदारसंघात आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी देण्यावरूनच संघर्ष होता. त्यात जगताप यांनी बाजी मारली खरी; मात्र पुन्हा एकदा त्यांचे बीट अंमलदार दूर पळाले आहेत. त्यांची धुरा सांभाळणारी अर्धा डझनाची टीम दुरावली आहे. डॉ. आरळी यांच्यासारखा कोरी पाटी असणारा जुना भाजपचा चेहरा बंडखोर आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात आहे. अशावेळी डबल ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी जगताप यांची कसोटी लागली आहे. ते त्यात माहीर असल्याने चुरस वाढली आहे. २००९ च्या चुकांतून ते यावेळी कसा धडा घेतात आणि भाजप त्यांना किती ताकद देते, याकडे आता लक्ष असणार आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊनच येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा घेतली आणि भाजपने वातावरण तापवले आहे.

खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सरचिटणीस मकरंद देशपांडे या जिल्ह्यातील नेत्यांवर या दोन मतदारसंघांतील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय, प्रदेश पातळीवरील काही वरिष्ठ नेते सातत्याने अपडेट घेत असून, छुप्या पद्धतीने दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Shirala, Jat battle ground for BJP