Vidhan Sabha 2019 : उद्धव ठाकरे म्हणाले, भविष्यात जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. 

जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. 

आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक मैदानावर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत श्री ठाकरे बोलत होते.

शिरोळ मतदार संघात काही बांडगुळांकडून आमदार उल्हास पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा बांडगुळांना त्यांची जागा दाखवा. स्वत:साठी कधीच काही न मागणाऱ्या जनतेच्या प्रश्‍नांसाठी मातोश्रीवर ठाण मांडणाऱ्या आमदार उल्हास पाटील यांना पुन्हा एकदा संधी देऊन विकासकामांना साथ द्या. 

-  उध्दव ठाकरे  

ते म्हणाले, निवडणूकीच्या तोंडावर काहींची सोंग सुरु आहेत. पण, राज्यात युतीचेच शासन येणार आहे. संकटाच्या काळात जनतेसाठी स्वत:ची जीव धोक्‍यात घालतो तोच लोकप्रतिनिधी असतो. महापुराच्या काळात कोणालाही न दिसणारे आज विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांना जाब विचारा. संकटात मदतीसाठी उभा रहात नाही तो लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या जातील. याला बळी पडू नका. 2014 च्या निवडणूकीप्रमाणे यावेळीही किमया करा.

लोकसभेला धैर्यशिल मानेंच्या रुपाने किमया केली आहे. अनेकांनी मोठमोठ्या यात्रा केल्या पण उल्हास पाटील यांनी सायकल यात्रा केली. तालुकाभर सायकल चालविण्याचा कोणत्या उमेदवारात दम आहे का? 

- उद्धव ठाकरे

श्री. ठाकरे म्हणाले, भगव्याच्या नादी लागू नका. गद्दारी भगव्याला मान्य नाही. गतवेळी भाजप बरोबर नव्हते, आज भाजप बरोबर आहे. एक मजबूत सरकार सत्तेवर आणा. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, स्वाती सासणे, अरुण कडाळे, संतोष धनवडे आदीनी मनोगत व्यक्त केले.

सेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, धनाजीराव जगदाळे, डॉ. संजय पाटील, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपतालुका प्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख सतीश मलमे, भाजपचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, मंडल अध्यक्ष मिलींद भिडे, नगरसेवक पराग पाटील, मुंबईच्या विद्या बडवे, शहर प्रमुख स्वप्निल शहा, महिला आघाडी प्रमुख अर्चना भोजणे उपस्थित होते. 

सैनिक टाकळी माती मस्तकी लावायची आहे
तालुक्‍यातील सैनिकांचे गाव असणाऱ्या सैनिक टाकळीला भेट द्यायची आहे. तेथील माती मस्तकी लावायची आहे. घराघरातील तरुणांनी देशसेवेचे ब्रीद घेतले आहे, असे श्री ठाकरे म्हणाले. 

उध्दव ठाकरे म्हणाले
* कॉंग्रेसला गाडा, भगवी सत्ता आणा
* महापुरात मते मागणारी मंडळी कुठे होती?
* विकासाची तळमळ असणाऱ्या आमदार उल्हास पाटील यांचा अभिमान
* शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार
* शरद पवार यांच्या उड्या सुरु आहेत
* सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्या देऊ
* सैनिक टाकळीत सैनिकी शाळा सुरु करणार
* 15 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देणार
* अल्पभूधारकांना दहा हजार देणार

निवडणूक निधी आणि शिवसेना प्रवेश
कार्यक्रमात अनेकांनी आमदार उल्हास पाटील यांच्यासाठी निवडणूक निधी दिला. तर जयसिंगपूर येथील वडार समाजाचे नेते लक्ष्मण कलकुटगी, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष संग्राम भोसले यांनी श्री ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Uddhav Thackeray comment in Jaysinghpur