vidhansabha 2019 : चंदगडमधून नेसरी जि. प. मतदारसंघातील हे पाच मात्तबर इच्छूक

दिनकर पाटील
गुरुवार, 18 जुलै 2019

  • आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ ठरणार केंद्र बिंदू.
  • या जि. प. मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक. 
  • विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे यांचा इच्छुकात समावेश

 

नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर गुरबे यांचा समावेश आहे. 

नेसरी जिल्हा परिषद मतदार संघात नेहमी कुपेकर घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. कै. बाबा कुपेकर याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेत निवडून गेले होते. तेंव्हापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असलेला हा गड गेल्या निवडणुकीत श्री. कोलेकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने घेतला. विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर चंदगडचीही आमदारकी कुपेकर घराण्याकडेच कायम आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष कै. कुपेकरांच्या निधनानंतर पत्नी संध्यादेवी यांच्याकडे सध्या आमदारकी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीचा संदर्भ पाहता विधानसभा निवडणूकीचे समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे. विधानसभेत येथील लढतही बहुरंगी होण्याचे दाट संकेत आहेत. इच्छुकांची मांदींयाळी पाहता सर्वच राजकीय पक्षांना तिकीट वाटपावेळी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सर्वसमावेशक उमेदवार निवडणे जिकीरीचे होणार आहे. नाराजीचा फायदा कोणाला होणार हे प्रत्यक्ष निवडणुक मैदानातच कळणार आहे.

दरम्यान, नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातूनच पाच जण विधानसभेसाठी इच्छूक आहेत. यामुळे तीन्ही तालुक्‍याच्या मध्यावर असलेल्या नेसरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीतही नेसरीच केंद्रबिंदू ठरणार आहे. नेसरीतील या पाच जणांशिवाय विधानसभेसाठी भरमू पाटील, ज्योती पाटील, गोपाळराव पाटील, सुरेश चव्हाण-पाटील, राजेश पाटील, महेश पाटील माजी आमदार श्रीपतराव शिंदे, राजेंद्र गडयान्नावर, प्रभाकर खांडेकर, रमेशराव रेडेकर, सुनिल शिंत्रे, अप्पी पाटील, अनिरूध्द रेडेकर, रियाज शमनजी, विष्णूपंत केसरकर हेही इच्छूक आहेत. 

नेत्यांकडूनही नेसरी टार्गेट... 
नेसरीमध्ये आजपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार विनायक राउत, माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, चित्राताई वाघ, खासदार उदयनराजे भोसले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी या मातब्बर नेत्यांच्या सभा, दौरे झाले आहेत. यामुळे नेसरीवरच अधिक लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Chandgad constituency special report